पिंपरी : जमीन-खरेदी विक्री व्यवहारात मोठ्या प्रमाणावर फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. देहूरोड, तळेगाव, वडगाव, मावळ, कामशेत, लोणावळा या भागात जमीन व्यवहारात फसवणूक होत असल्याच्या तक्रारींचे प्रमाण सर्वाधिक आहे. जमिनीला भाव आल्याने निव्वळ पैैसा कमाविण्याच्या उद्देशाने गुंड प्रवृत्तीच्या काही लोकांनी ‘इस्टेट एजंट’ म्हणून या व्यवसायात शिरकाव केला आहे. त्यांच्याकडून गुंडगिरी, दहशत माजविण्याचा प्रयत्न होत आहे. देहूरोड तसेच परिसरात शेतकरी तसेच जमीन खरेदी करणारे नागरिक गुंडाराज परिस्थितीने हैराण झाले आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड शहराच्या परिसरात बांधकाम व्यावसायिकांकडून मोठे गृहप्रकल्प साकारले जात आहेत. थोड्या जमिनी, भूखंड शिल्लक आहेत. त्यांचे भाव आवाक्यात राहिलेले नाहीत. शहरात घर अथवा भूखंड घेणे परवडणारे नाही. त्यामुळे शहरालगत ग्रामीण भागात गुंठा, अर्धा गुंठा जागा खरेदी करण्यास नागरिक प्राधान्य देतात. अलीकडच्या काळात मागणी वाढल्याने ग्रामीण भागातील भूखंडाचे भावसुद्धा वाढले आहेत. बक्कळ पैसे कमावण्याचा मार्ग म्हणून काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी या व्यवसायात आपले बस्तान बांधले आहे. त्यांना राजकीय वरदहस्तसुद्धा लाभला आहे. एकच भूखंड एकापेक्षा अधिक लोकांना विक्री करणे, दमदाटी करून जागेचा ताबा घेणे, गुंडगिरी, दहशत माजवून जबरदस्तीने जागेचा ताबा मिळविणे असे प्रकार घडू लागले आहेत. त्यातून धमकी, फसवणूक, हाणामारी अशा स्वरूपाच्या गंभीर गुन्ह्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल होत आहेत. ग्रामीण भागातील देहूरोड तसेच मावळातील तळेगाव, वडगाव, कामशेत, लोणावळा या पोलीस ठाण्याच्या हद्दीत जमीन खरेदी-विक्री व्यवहाराच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी घटना घडत आहेत. फसवणुकीची तक्रार दाखल करण्यास गेल्यानंतर हा ‘सिव्हिल मॅटर’ आहे. न्यायालयात अर्ज दाखल करा, असा सल्ला देऊन पोलीस गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ करतात. गुन्हेगारी कृत्य घडल्यास फौजदारी कारवाई करू, असे सांगून पोलीस वेळकाढू भूमिका घेतात. जमीन खरेदी व्यवहारात फसवणूक झाल्यानंतर पोलिसांकडे दाद मागूनही मदत मिळत नाही. त्यामुळे तक्रारदारांवर हतबल होण्याची वेळ येत आहे. तक्रारदारांना पोलीस दाद देत नसल्याचा गैरफायदा फसवणूक करणारे दलाल उठवू लागले आहेत. स्थानिक पोलिसांकडून तक्रारदारांचे समाधान होईल, अशी कारवाई होत नसल्याच्या तक्रारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे दाखल होऊ लागल्या आहेत. (प्रतिनिधी)तक्रारी आर्थिक गुन्हे शाखेकडे करा : जय जाधवपुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात जमीन व्यवहारासंबंधी फसवणुकीच्या तक्रारींचे प्रमाण वाढले आहे. स्थानिक पोलीस ठाण्यातील अपुऱ्या कर्मचारीवर्गामुळे वेळेत तक्रारींचे निवारण होत नाही. परिणामी, जनतेच्या मनात पोलिसांबाबत गैरसमज निर्माण होत आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या फसवणुकीच्या तक्रारी थेट गुन्हे आर्थिक शाखेकडे दाखल कराव्यात, असे आवाहन पुणे ग्रामीण विभागाचे पोलीस अधीक्षक जय जाधव यांनी केले आहे. जमीन व्यवहारात फसवणूक झाल्याच्या तक्रारींचे प्रमाण देहूरोड, पौड, तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआडीसी, वडगाव मावळ, कामशेत, लोणावळा, हवेली, वेल्हा, राजगड या पोलीस ठाण्यांमध्ये अधिक आहे. दैनंदिन कामकाज करताना अशा प्रकारच्या वाढत्या तक्रारींचा निपटारा करताना पोलिसांवर अतिरिक्त ताण येतो. वेळीच तक्रारींचा निपटारा होत नाही. त्यामुळे अशा स्वरूपाच्या तक्रारी गुन्हे आर्थिक शाखेकडे दाखल करण्यास मुभा देण्याचा निर्णय ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाने घेतला आहे. चव्हाणनगर पोलीस मुख्यालय, पाषाण रस्ता, पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयाकडे अर्ज करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. शिवाय, सद्य:स्थितीत दाखल असलेले गुन्हे, सुरू असलेली चौकशी अशा अर्जांसाठी पोलीस व तपासी अधिकारी सहकार्य करत नसतील, पैशांच्या देवाण-घेवाणीसह त्यांच्याबाबत अन्य काही तक्रारी असतील, तर अधीक्षकांशी संपर्क साधावा, असेही जाधव यांनी नमूद केले आहे.
देहूरोड परिसरात वाढले गुंडाराज
By admin | Published: December 16, 2015 3:00 AM