लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यात गेल्या आठ-दहा दिवसांपासून गावा-गावत धडाडणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराच्या तोफा मंगळवार (दि.१३) रोजी सायंकाळी थंडावल्या. जिल्ह्यातील ६४९ ग्रामपंचायतीसाठी आता गुरुवार (दि.१५) जानेवारी रोजी मतदान होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.
जिल्ह्यातील ७४८ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यापैकी ९५ ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. यामुळे आता ६४९ ग्रामपंचायतीसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीत गेल्या आठ दिवसांत सर्व उमेदवाराने जोरदार प्रचार केला. यात काही उमेदवारांनी सोशल मीडियाचा वापर करत जोरदार प्रमोशन केले, तर गेल्या काही दिवसांत ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणूक असलेल्या गावात पार्ट्यांवर पार्ट्या सुरू आहेत. अनेक ठिकाणी पॅनल उभे करून उमेदवारांनी प्रचारात रंगत आणली, घरोघरी जाऊन प्रचार, गाठीभेटी घेण्यावर उमेदवारांनी भर दिला. जिल्ह्यात अनेक ग्रामपंचायतीत तरुण उमेदवारांनी विविध माध्यमांचा वापर करत प्रचारात आघाडी घेतली. प्रचार फेरी काढताना ट्रकवर, बैलगाडी, ओपन जिप्सीचा वापरही मोठ्या प्रमाणात केला, तर काहीने आपल्या पदयात्रेद्वारे प्रचार केला.
आता येत्या १५ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे, तर १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.
---------
मतदान होणाऱ्या ग्रामपंचायती : ६४९
- एकूण मतदान केंद्र : २,४६१
- निवडणुकीच्या रिंगणात असलेले उमेदवार : ११,००७
- निवडणूक अधिकारी, कर्मचारी : १२,३०५
- एकूण मतदार : १४ लाख ५८ हजार ३६७