पुणे : दोघांच्या भांडणातील दुसऱ्याची तक्रार आधी घेत असल्याने रागावलेल्या गुंठामंत्र्याने पोलीस चौकीत पोलिसाला शिवीगाळ करून नाकाला धडक देऊन धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी राहुल लक्ष्मण भरम (वय ४८, रा. केळेवाडी, पौड रोड, कोथरूड) याला अटक केली आहे. आपण यापूर्वी तीनचार पोलिसांना मारले, तुलाही सोडणार नाही, अशी धमकी त्याने पोलीस कॉन्स्टेबलला दिली.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल कौस्तुभ रवींद्र निढाळकर यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना एरंडवणा पोलीस चौकीत १५ जानेवारी रोजी रात्री साडेदहा वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, राहुल भरम आणि राहुल वाघ यांच्यात भांडणे झाली होती. दोघेही तक्रार देण्यासाठी एरंडवणा पोलीस चौकीत आले होते. त्या वेळी कौस्तुभ निढाळकर यांनी तक्रारी शांत राहून एका-एकाने द्या असे समजावून सांगत होते. राहुल भरम याला बाजूला बसायला सांगितले. तेव्हा भरम याने तुम्ही त्याची तक्रार का अगोदर घेताय, तुम्ही मला साईडला बसण्यास का सांगता, मी कोण आहे, तुम्हाला माहिती नाही. मी गुंठामंत्री आहे. तुमची नोकरी घालवीन असे बोलून शिवीगाळ करून निढाळकर यांच्या नाकाला धडक देऊन धक्काबुक्की करून दुखापत केली. मी या अगोदर तीन-चार पोलिसांना मारले आहे. तुला पण सोडणार नाही. तू मला उद्या भेट बघतो, असे बोलून त्यांना धमकावले.
कोथरूड पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करून राहुल भरम याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक पडवळे अधिक तपास करीत आहेत.