लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : बंदी असूनही बेकायदेशीरपणे गुंठेवारीची दस्त नोंदणी केल्याप्रकरणी भोसरी येथील दुय्यम निबंधक एल. ए. भोसले यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांनी ६३५ दस्तांची नोंदणी बेकायदेशीरपणे केल्याचे उघड झाले आहे. नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांनी ही कारवाई केली आहे. राज्यातील ही पहिलीच कारवाई आहे.
भोसले यांनी केलेल्या यांनी केलेल्या बेकायदा दस्त नोंदणीमुळे शासनाचे १९ लाख ८४ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. गेल्या काही वर्षांमध्ये जमिनीच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. त्यामुळे जमिनीचे तुकडे करून त्यांची विक्री करण्याचे प्रकार वाढले आहेत. महसूल अधिनियमातील तरतुदीनुसार तुकडेबंदी लागू आहे. तरीदेखील असे व्यवहार होत असून त्यांची दस्त नोंदणीही होत आहे. राज्य सरकारने या संदर्भात नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला चौकशीचे आदेश दिले होते. हवेली तालुक्यातील भोसरी येथील सहदुय्यम निबंधक भोसले यांनी बेकायदेशीरपणे गुंठेवारीच्या शेकडो दस्तांची बेकायदेशीर नोंद केल्याचे तपासणीत समोर आले. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
शासनाच्या नियमाप्रमाणे कोणत्याही जमिनीचे हस्तांतरण किवा विभागणी, तुकडा निर्माण होईल अशा रितीने करता येत नाही. प्रत्येक जिल्ह्याकरिता प्रमाणभूत क्षेत्र ठरवून देण्यात आलेले आहे. त्यापेक्षा कमी क्षेत्राचे/तुकड्याचे हस्तांतरणाचे दस्त नोंदविताना सक्षम प्राधिका-याची पूर्व परवानगी घेणे आवश्यक असते.