तळेघर (पुणे) : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या श्रीक्षेत्र भीमाशंकर दणाणून टाकत गोरक्ष मठामध्ये त्र्यंबकेश्वर येथील मठाधिपती गुरुवर्य पीर गणेशनाथ महाराज यांच्या उपस्थितीत गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
गुरू पूजनानंतर गुरुवर्य गणेशनाथ महाराज की जय, जंगल वस्ती भीमाशंकर महाराज की जय असा जयजयकार करत आलेल्या हजारो भाविक भक्तांनी रांग लावली होती. गुरुवर्य गणेशनाथ महाराज यांनी सर्वांना शुभाशीर्वाद देत महाप्रसाद घेण्याचा आग्रह केला. यावेळी गोरक्ष मठामध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सालाबादाप्रमाणे याही वर्षी गुरुपौर्णिमेला गोरक्ष मठामध्ये कोकण, नगर, पुणे, मुंबई, नाशिक, त्र्यंबकेश्वर, खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर, मावळ, येथून हजारो भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पुणे व कोकण येथील काही भक्तगणांनी गोरक्षनाथ मठामध्ये रंगबेरंगी फुलांची सजावट केली होती.
गोरक्ष मठामध्ये ब्रह्मवृंद आशिष कोडीलकर व सहकाऱ्यांनी मठ मंदिर प्रदिक्षणा करत ब्रह्मवृंदांच्या वेदपठनासमवेत याग यज्ञ केला. महापूजा करून पीर गणेशनाथ महाराज यांचे गुरू वैराग्यमूर्ती कमलनाथाजी महाराज यांच्या पादुकांचे पूजन व अभिषेक करण्यात आला. गोरक्षनाथांची महाआरती करण्यात आली. यानंतर पीर गणेशनाथ महाराज यांना गादीवर बसवून गुरू पूजन करण्यात आले. सोमवारी सकाळपासूनच गुरुपौर्णिमेनिमित्त श्री क्षेत्र भीमाशंकर येथील गोरक्ष मठावर भक्तांची गर्दी झाली होती.