लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीतर्फे यंदाचा श्रीगुरुजी पुरस्कार प्रख्यात वास्तुविशारद चंद्रकांत सोमपुरा आणि तामिळनाडूतील हिंदू मुन्नाणी संघटनेला प्रदान केला जाणार आहे. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
जनकल्याण समितीचे प्रांत कार्यवाह तुकाराम नाईक यांनी प्रसिद्धपत्रकाद्वारे ही माहिती दिली. पुरस्कार प्रदान कार्यक्रम येत्या रविवारी (दि. ७) सायंकाळी सहा वाजता डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या गोळवलकर गुरुजी विद्यालयाच्या गणेश सभागृहात होणार आहे. प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून रा. स्व. संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुहास हिरेमठ प्रमुख वक्ते आहेत.
गांधीनगर येथील अक्षरधाम मंदिर, सुरत आणि मुंबईतील स्वामी नारायण मंदिर, सिंगापूरमधील शिवमंदिर, बँकाकमधील विष्णू मंदिर, शिकागो आणि होस्टनमधील जैन देवघर आदी १२९ मंदिरांचे निर्माते ही सोमपुरा यांची ओळख आहे. अयोध्येतील नियोजित श्रीराम मंदिराचा आराखडाही सोमपुरा यांनी तयार केला आहे.
हिंदूंचे हक्क, हित आणि हिंदू मंदिरांसाठी तामिळनाडूत कार्य करणारी संस्था ही हिंदू मुन्नाणी संघटनेची ओळख आहे. रामगोपालन ऊर्फ गोपालजी यांनी १९८० मध्ये या संघटनेची स्थापना केली. तामिळनाडूतील धर्मांतर, गोहत्या, मंदिरांवरील शासकीय नियंत्रण या विरूद्ध संघटनेने सातत्याने संघर्ष केला आहे.