पुणे : ‘तुच सुखकर्ता तुच दु:खहर्ता, अवघ्या दीनांच्या नाथा, बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे, चरणी ठेवितो माथा... झाले पुरे एक वर्ष, होतो वर्षाने एकदाच हर्ष, गोड अन्नाचा होतो रे स्पर्श, घ्यावा संसाराचा परामर्श, पुऱ्या वर्षाची साऱ्या दुखाची, वाचावी कशी मी गाथा... बाप्पा मोरया रे... सेवा जाणुनी गोड मानुनी, द्यावा आशीर्वाद आता, बाप्पा मोरया रे...’ हाच भाव मनी बाळगून लहान-थाेर आपल्या लाडक्या बाप्पाचे शनिवारी (दि. ७) घराेघरी आणि मंडळांमध्ये थाटामाटात स्वागत करत आहेत. ‘गणपती बाप्पा माेरया’चा जयघाेष करत लाडका बाप्पा घरी आणला जाणार आहे. हे चित्र पाहून ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ या गाण्याने आठवण करून दिली नाही तरच नवल.
दुसरीकडे गुरूजींना प्रचंड मागणी असल्याने ते बिझी झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे अनेकांच्या घरी गुरूजी पोहोचू शकणार नाहीत. तरीही भाविकांना घरच्या घरी पूजा करता येणार आहे. सध्या पुणे शहरामध्ये गुरूजींचा भाव चांगलाच वधारला आहे. कोणतीही पूजा करायची असेल तर ते हजारो रुपये दक्षिणा घेत आहेत. अनेक गुरूजींचे काम ऑनलाइन झाले आहे. त्यांनी स्वत:चे ॲपदेखील तयार केले आहे. या ॲपद्वारे ऑनलाइन बुकिंग करण्यात येत आहे. याद्वारे ऑनलाइन सेवादेखील घेता येणार आहे.
श्रावण महिन्याची सुरूवात झाली की, आम्हाला खूप निमंत्रणे असतात. त्यानंतर लगेच गणेशाेत्सव असल्याने मागणीत वाढ होते. गणेशोत्सवात दिवसाला १५ ते २० निमंत्रणे येतात. पण अनेकांना नकार द्यावा लागतो. तेवढा वेळ मिळत नाही. - आदिनाथ शिवगुरे, पौरोहित्य
साधारण वर्षभर आम्हाला मोठ्या प्रमाणात मागणी असते. पण गणेशोत्सवावेळी पूर्णपणे वेळापत्रक बदलते. गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी महिन्याभरापूर्वीच बुकिंग घेतले आहे. श्रावणात सर्वाधिक सत्यनारायणाची पूजा होते. - दीप्ती जोशी, पौरोहित्य
घरच्या घरी कशी कराल श्री गणेश प्रतिष्ठापना
आपल्या सोयीनुसार घरच्या घरीदेखील श्री गणेशाची पूजा करता येऊ शकते. गणेशाची मूर्ती मखरात ठेवावी, बसण्यासाठी आसन किंवा पाट घ्यावा. श्री गणेशाचे पूजन करताना शुचिर्भूत असावे, घरात वाद-विवाद न करता प्रसन्नपणे सर्वांनी एकत्र असावे. देवाला काहीही समर्पण करत असताना ते उजव्या हातानेच वहावे. मूर्तीवर पाणी, पंचामृत, अर्घ्य वाहताना फुलाने किंवा दुर्वांनी वहावे. वडीलधाऱ्यांपैकी एकाने पूजा सांगावी. त्यांच्यापेक्षा लहान व्यक्तीने पूजा करावी. प्रथम कपाळी तिलक धारण करून आचमन करावे. देवापुढे आणि पूजेला प्रारंभ करावा. पुढे दिलेल्या तीन नावांचा उच्चार करून प्रत्येक नावाच्या शेवटी संध्येच्या पळीने उजव्या हातावर पाणी घेऊन प्यावे. केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः असा मंत्राेच्चार करावा. त्यानंतर देवांच्या नावांचे स्मरण करावे. कलश, शंख, घंटा, दिवा, समई यांची पूजा करावी. गंध, अक्षता, फुले, हळद-कुंकू वहावे. कलशातील पाणी सर्व पूजा सामुग्रीवर फुलाने शिंपडावे. श्री गणेशाला स्पर्श करून मनात १६ वेळा ‘ॐ’ म्हणावे. नंतर श्री गणेशाच्या नेत्रांना तूप लावावे. अथर्वशीर्ष म्हणावे. श्री गणेशाची आरती करावी, स्वतःभोवती प्रदक्षिणा करावी. - ज्योतिर्विद राहुल मुलमुले