अधिवेशनाच्या नावाखाली सहा दिवसांच्या पगारी सुट्टीवर गेलेल्या प्राथमिक शिक्षकांमुळे जिल्ह्यातील ८० टक्के शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, पालक संताप व्यक्त करीत आहेत.‘गुरुजी गेले अधिवेशनाला, कुलूप लागले शाळेला, अशी परिस्थिती जिल्ह्यातील शाळांची झाल्याचे चित्र आहे.मार्गासनी: वेल्हे तालुक्यात दुर्गम भागाचा अगोदरच येथील शिक्षकांनी फायदा घेत असून, शाळेत उशिरा येणे, वाहतुकीची सुविधा नसल्याचे सांगून वेळेअगोदर शाळेतून निघून जाणे आणि जोडून सुट्ट्यांच्या कालावधीत शाळांना दांड्या मारणे, असे प्रकार सुरू असतानादेखील आता अधिवेशनाच्या नावाखाली शिक्षकांनी आपली नैतिक जबाबदारी झटकत सहा दिवस शाळा बंद ठेवून कोणता आदर्श निर्माण करत आहेत, असा प्रश्न वेल्हे तालुक्यातील नागरिकांना व विद्यार्थ्यांच्या पालकांना पडला आहे. वेल्हे तालुक्यात जिल्हा परिषद शाळांशिवाय विद्यार्थ्यांना पर्याय नाही. कारण या ठिकाणी खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळा नाहीत. जिल्हा परिषदेच्या शाळांना स्पर्धेसाठी इतर खासगी संस्था, इंग्रजी माध्यमाच्या संस्था अद्यापही स्पर्धेत नसल्याने तालुक्यातील प्राथमिक शाळेची पटसंख्या कित्येक शाळांत समाधानकारक आहे.वेल्हे तालुक्यातील कित्येक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पालकांचा व्यवसाय हा शेती असून, आर्थिक कुवत कमी असल्याने नसरापूर किंवा भोर या ठिकाणी इंग्रजी माध्यमांना जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या फारच कमी आहे. वेल्हे तालुक्यात एकूण १४६ प्राथमिक शाळा असून, ४६०० विद्यार्थी शिकत आहेत, तर या विद्यार्थ्यांना १६ केंद्रांमधून २९९ शिक्षक शिकवित आहेत. या १४६ शाळांपैकी फक्त ३० शाळा अधिवेशन काळात सुरू असल्याची माहिती वेल्ह्याचे गटशिक्षण अधिकारी आर. बी. अभिमाने यांनी दिली. (वार्ताहर)तालुक्यातील जास्त पटसंख्या असलेल्या शाळांमधील शिक्षकांनी शाळा सुरू ठेवणे आवश्यक होते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीस जबाबदार कोण? -सविता वाडघरे, सभापती, पंचायत समिती, वेल्हे शिरूर: तालुक्यातील निम्म्या शाळांमधील ५३१ शिक्षक अधिवेशनाला गेल्याने ८७ शाळा बंद आहेत. अनेक शाळांना कुलूप असून, इतर शाळा नावाला उघड्या असल्याचे वास्तव आहे. अधिवेशनाला गेलेल्या शिक्षकांची सहा दिवसांची रजा मांडली जाणार असल्याचे गटशिक्षणाधिकारी अर्जुन मिसाळ यांनी सांगितले.तालुक्यात २६४ प्राथमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये एकूण १२३४ शिक्षक कार्यरत आहेत. या शिक्षकांपैकी ५३१ शिक्षक अधिवेशनाला गेल्याचे (कागदोपत्री) गटशिक्षणाधिकारी मिसाळ यांनी सांगितले. मिसाळ यांच्या म्हणण्यानुसार कागदोपत्री जरी ही संख्या असली, तरी बरेचसे शिक्षक शाळेवर आहेत. अनेक ठिकाणी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. कागदोपत्री ३६४ पैकी ८७ शाळा बंद आहेत. मात्र, यापैकी केवळ सणसवाडी व आपटी शाळाच बंद असल्याचे मिसाळ यांचे म्हणणे आहे. मात्र, शाळांवर शिकवण्यास शिक्षकच नसतील, तर त्या शाळांना कुलूप असले काय अन् त्या उघड्या असल्या काय? त्या बंदच म्हणाव्या लागतील. गटशिक्षणाधिकारी मिसाळ एका बाजूला शाळा बंद नसल्याचे सांगत असताना एका केंद्रप्रमुखाने मात्र ८७ शाळा पूर्ण बंद असल्याचे सांगितले. पर्यायी व्यवस्था करायला माणसंच (शिक्षक) कुठे आहेत, असा प्रश्नही त्यांनी केला. एकंदरीत शिक्षक अधिवेशनाला गेल्याने तालुक्यातील या शाळा सहा फेब्रुवारीपर्यंत बंदच राहणार, हे नक्की. मिसाळ यांच्या म्हणण्यानुसार केवळ आॅनरेकॉर्ड ५३१ शिक्षक अधिवेशनास गेले आहेत. ऐन परिक्षेच्या काळात अधिवेशन आल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानीस सामोरे जावे लागत आहे.प्रत्यक्षात बहुतांशी शिक्षक तालुक्यातच आहेत. काही शिक्षकांनी अनधिकृतपणे शाळांमध्ये तासही घेतल्याचे त्यांनी सांगितले. काही असले, तरी ५३१ शिक्षकांची सहा दिवसांची रजा मांडण्यात येणार असल्याचे मिसाळ यांनी सांगितले. (वार्ताहर)
गुरुजी अधिवेशनाला, कुलूप शाळेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2016 1:32 AM