डेहणे : आदिवासींना जास्तीच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असताना कुंपणच शेत खात असल्याने खेड तालुक्याच्या आदिवासी भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये मात्र विदारक चित्र आहे.शालेय कामकाज व विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता हा प्रश्न वेगळाच; परंतु साधी शाळांमध्ये वेळेवर जाण्याची शिस्त या भागातील अनेक शिक्षकांना नसल्यामुळे शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. ‘लोकमत’च्या पाहणीत अनेक शाळांमध्ये शिक्षक १२ वाजेपर्यंत पोहोचलेलेच नव्हते, तर काही शिक्षक गावकऱ्याल शाळेत ठेवून पोषण आहार आणण्यासाठी गेले होते. विशेष म्हणजे, एक शिक्षक शाळा बंद करून विद्यार्थ्यांनासह साखरपुड्याच्या कार्यक्रमाला हजर होते. अनेक शाळांमध्ये ११ वाजेपर्यंत विद्यार्थीच शाळा चालवताना दिसले.विशेष म्हणजे, या लेटलतीफ शिक्षकांना अधिकाऱ्यांचेच अभय असल्याचे दिसून येते, कारण अनेकदा तक्रार करूनही शिक्षक दुर्लक्ष करीत असल्याचे वास्तव चित्र आहे.या शिक्षकांमुळे जि.प. शाळातील विद्यार्थिसंख्या रोडावत आहे. शाळेत उशिरा येणे, गप्पा मारणे, दांडी मारणे या प्रकारामुळे येथील विद्यार्थी शाळेच्या वेळेतही इकडे-तिकडे भटकत असतात. त्या विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळात शिकविले जावे, त्यांच्या गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असताना हे शिक्षक स्वत:च्या वैयक्तिक समस्यांमध्ये गुंतलेले आहेत. आदिवासी भागात आम्ही शिक्षा भोगत आहोत.दीडशे किमीवरून आम्ही शाळेत वेळेवर कसे पोहोचणार, अशी प्रतिक्रिया शिक्षक देत आहेत. शासन पातळीवर डिजीटल शाळा, तंत्रस्नेही शिक्षक, प्रगत शाळा, स्पोकन इंग्लिश, समाज सहभाग, ज्ञानरचनावाद, अभ्यासिका, डिजीटल शाळा, वाचन आनंद दिवस, वाचन प्रेरणा दिवस यासारखे विविध उपक्रम राबविले जात आहेत. खासगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषदेच्या शाळा कुठेही मागे राहू नयेत असा शिक्षण विभागाचा मानस आहे.या सर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी केंद्रप्रमुख, शिक्षणविस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी शाळांना अचनाक भेटी देऊन शिक्षक वेळेत उपस्थित झाले किंवा नाही, याची पाहणी करतात की नाही, असा प्रश्न पालकांना पडला आहे. गुरुजीच उशिरा, ही बाब योग्य नसल्यामुळे जिल्हा परिषदेने शाळेतील शिक्षक वेळेच्या आत शाळेत यावेत, यासाठी कृतिशील नियोजन करणे गरजेचे आहे.बायोमेट्रिक (थम्ब मशिन) हाच पर्याय‘ग्रामीण भागातील शाळांमध्ये बायोमेट्रिक मशिन बसविण्यात यावेत, अशी मागणी आता पालक करताना दिसत आहेत. अनेकदा सांगितले तरी शिक्षक ऐकत नसल्यामुळे व मर्यादा असल्याने केंद्रप्रमुख हतबल आहेत. अशा वेळी बायोमेट्रिक हाच पर्याय योग्य आहे व त्या दृष्टीने पंचायत समिती प्रयत्न करीत आहेत. डेहणे, वाळद व अन्य सहा शाळांमध्ये या मशिन बसविण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रत्येक शाळेत बायोमेट्रिक मशिन बसविण्याचा उपक्रम राबवण्यात येणार आहे.- भगवान पोखरकर, उपसभापती पंचायत समिती खेडजिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना खासगी शाळांच्या धर्तीवर दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शैक्षणिक साहित्याच्या प्रभावी वापरातून प्रत्येक मूल निर्धारित पातळी गाठू शकेल.शाळाबाह्य मुलांच्या बाबतीत स्थानिक स्तरावरून काम करीत १०० टक्के मुलांना शाळेत दाखल करून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे उद्दिष्ट व उद्देश आहे. मात्र, जिल्हा परिषदेच्या शाळांतील शिक्षक विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी वेळेवर शाळेत पोहोचत नाहीत किंवा शाळा सुरू असतानाही आपले काम आटोपण्यासाठी शाळेच्या बाहेर अनेकदा जातात.
आदिवासी भागातील शाळांमध्ये गुरुजीच उशिरा; खेड तालुक्यातील विदारक चित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 2:16 AM