पुणे : यंदा ‘गुरुपौर्णिमा’ दि. २३ की २४ जुलैला साजरी करायची याबाबत अनेकांमध्ये संभ्रम आहे. मात्र, गुरुपौर्णिमा ही दि. २३ जुलैलाच करणे योग्य आहे. काही पंचांगकर्ते ६ घटीऐवजी ४ घटीचा नियम विकल्पाने घेतात म्हणून त्यांच्या पंचांगात दि. २४ जुलैला गुरुपौर्णिमा दिलेली आहे. धर्मसिंधुमध्ये स्पष्टपणे पौर्णिमा ३ मुहूर्तापेक्षा अधिक असेल तर पौर्णिमेस व्यासपूजन करावे असे दिलेले आहे. ३ मुहूर्त म्हणजे ६ घटीपेक्षा कमी असेल तेव्हा चतुर्दशीच्या दिवशी व्यासपूजन, गुरुपौर्णिमा करावी. पंचांगातील शास्त्रवचनानुसार दि. २३ जुलैलाच गुरुपौर्णिमा साजरी करावी, असे पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितले.
महाराष्ट्र व गुजरातसह भारतामधील अनेक पंचांगात तसेच सर्व दिनदर्शिकेमध्ये मध्ये दि. २३ जुलै रोजी गुरुपौर्णिमा दिली आहे. मात्र, गुरुपौर्णिमा ही दिनांक २३ जुलै या दिवशी नसून दि. २४ जुलै रोजी साजरी करणे शास्त्रसंमत असणार आहे. भारतातील बहुतांशी सर्वच पंचांगात गुरुपौर्णिमा अर्थात व्यासपौर्णिमा ही दि. २४ जुलै रोजी दिलेली आहे. भारतातील बहुतांशी सर्व राज्यांत दि. २४ जुलै रोजीच व्यासपौर्णिमा साजरी होणार आहे असे सांगितले जात असल्यामुळे यंदाची गुरुपौर्णिमा नक्की कधी साजरी करावी यासंबंधी संभ्रमाचे वातावरण आहे. परंतु, गुरुपौर्णिमा ही दि. २३ जुलैला साजरी करणे योग्य आहे. पौर्णिमा ६ घटीपेक्षा जास्ती असेल तर पोर्णिमेस व्यास पूजन गुरू पोर्णिमा करावी. अर्थात ६ घटी पेक्षा पोर्णिमा कमी असेल तर चतुर्दशीला व्यास पूजन करावे. दि.२४ ला पौर्णिमा ४ घटी ४३ पळे आहे. काही पंचांगकर्ते ६ घटीऐवजी ४ घटीचा नियम विकल्पाने घेतात म्हणून त्यांच्या पंचांगात दि. २४ ला गुरुपौर्णिमा दिलेली आहे, असे दाते यांनी स्पष्ट केले.
-----------