लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : डेक्कन एज्युकेशन सोसायटीची न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशाला यंदा अमृतमहोत्सव वर्ष साजरा करीत आहे. याच पार्श्वभूमीवर रमणबाग माजी विद्यार्थी संघाकडून गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.
नुकत्याच झालेल्या गुरुपौर्णिमेनिमित्त माजी विद्यार्थी संघातर्फे एक खास कार्यक्रम प्रशालेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास संघाकडून माजी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. प्रशालेच्या शिक्षिका सुवर्णा केदारी यांनी गुरुवंदना सादर केली.
रमणबाग प्रशालेचे माजी विद्यार्थी डॉ. जयंत जोशी अध्यक्षस्थानी, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष डॉ. महेश आठवले प्रमुख पाहुणे तसेच राष्ट्रीय खोखोपटू आणि जनता सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष व माजी विद्यार्थी संजय लेले आणि संघाचे सभासद उपस्थित होते. माजी शिक्षकांपैकी भा. काकडे आणि टी. के. आपटे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
प्रशालेचे मुख्याध्यापक दिलीप रावडे यांनी शाळेच्या विकासासंबंधी समाधान व्यक्त केले. जुन्या पिढीचे व शारीरिक शिक्षक कै. रामभाऊ लेले यांच्या स्मरणार्थ व्यायामशाळा सुरू करावी असा संकल्प केला. कार्यक्रमाचे संयोजन रवींद्र इनामदार आणि नारायण गरुड यांनी केले. सुहास धारणे यांनी सूत्रसंचालन केले.