चाकण : राज्यात गुटखा विक्री बंदीचा नियम शासनाने लागू केला असला तरी खेड तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात सर्वत्र खुलेपणाने गुटखा विक्री सुरू आहे. महिन्याकाठी गुटखा विक्रीच्या माध्यमातून हजारो रुपयांचा उलाढाल सुरू असल्याची चर्चा सध्या तालुक्यात सुरू आहे. खेड तालुक्यातील होलसेल विक्रीदार, टपरी, किराणा दुकानात गुटखा छुप्या मार्गाने येत असला तरी ही बाब संबंधित लोकांपासून लपून राहिलेली नसून यामुळे सामान्य लोकं व्यसनाधीन होत आहेत.
गुटख्यामुळे कर्करोगासारख्या घातक रोगांचे मूळ असलेली तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ सेवन करू नका, असे आवाहन शासनाच्या आरोग्य विभागाकडून दूरचित्रवाणी आणि वृत्तपत्रांच्या माध्यमातून सातत्याने केले जात आहे. महाराष्ट्रात गुटखा विक्रीवर बंदी घालण्यात आली असून गुटखा विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. तरीही सर्वत्र खुलेआम चढ्या भावाने गुटखा विक्री सुरू आहे.
गुटखा बंदी असतानाही राजगुरुनगर, चाकण, आळंदी, चिंबळी, कुरुळी, निघोजे, महाळुंगे, खालूंब्रे, आंबेठाण, भोसे, शेल पिंपळगाव, वाकी या मोक्याच्या गावांसह परिसरातील सर्व वाड्या-वस्त्यांवरील किराणा मालाची दुकाने आणि पान टपऱ्यांवर सर्रास गुटखा विक्री सुरू आहे. तर पुणे-नाशिक महामार्गावर चिंबळी व कुरुळी येथे मोठी गोदामे असल्याने यापूर्वी येथील गोदामांवर छापे टाकून करोडो रुपयांचा गुटखा जप्त केला असला तरी परिसरात मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री सुरु आहे. या प्रकारामुळे महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या गुटखा विक्री बंदीची सर्रास पायमल्ली होत शासनाच्या या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात असून पैशासाठी नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचे वास्तव आहे. हे प्रकार रोखण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तसेच अन्न व औषध प्रशासनाने कडक पावले उचलत सर्रासपणे गुटखा विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.