लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महाराष्ट्रात अवैधमार्गाने होणाऱ्या गुटखा विक्रीची पाळेमुळे शोधून काढत, कर्नाटकात जाऊन तंबाखू उत्पादन आणि साठवणूक करणाऱ्या ठिकाणी छापे टाकून १२० कोटी रूपयांचा गुटखा व त्यासाठी लागणारा कच्चा माल, यंत्रसामुग्री महाराष्ट्र पोलिसांनी जप्त केली. परराज्यात जाऊन अशा प्रकारच्या छाप्याची कारवाई महाराष्ट्र पोलिसांनी पहिल्यांदाच केल्याचे सांगितले जात आहे. अवैध उद्योगांवरील ही आजवरची सर्वात मोठी कारवाई आहे.
गुटखा विक्रीला आळा बसण्याकरता पोलीस आयुक्तांनी सुरू केलेल्या गुटखा विरोधी मोहिमेंतर्गत आजपर्यंत २८ ठिकाणी छापे टाकून अवैध गुटखा पकडण्यात आला. संबंधित पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड सहिता, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा, सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम आणि अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या मोहिमेअंतर्गत पोलीस ठाणे चंदननगर हद्दीत सुरेश अग्रवाल, अक्षय सुरेश अग्रवाल, आकाश सुरेश अग्रवाल, प्रवीण मुकुंद वाहुळ, नीरज मुकेश सिंगल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या छाप्यात साडेसात लाख रूपयांचा गुटखा व वाहने जप्त करण्यात आली. या गुन्ह्याचा तपास युनिट ४ च्या गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. या गुन्ह्याच्या तपासात प्रतिबंधित गुटख्याच्या व्यवसायातून होणारी आर्थिक उलाढाल हवाला मार्फत होत असल्याचे निष्पन्न झाले.
पोलीस आयुक्तांनी पोलीस उपायुक्त परिमंडळ १ च्या मार्फत ५ हवालाद्वारे व्यवहार करून देणाऱ्या ठिकाणांवर छापे टाकून सुमारे ४ कोटी रूपयांची रक्कम जप्त केली. चंदननगर पोलीस ठाण्याच्या छाप्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्हयाच्या तपासात एकूण १८ आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींकडे करण्यात आलेल्या तपासात प्रतिबंधित गुटख्याचा पुणे व उर्वरीत महाराष्ट्रातील वितरक अरूण तोलानी असल्याचे निष्पन्न झाले.
महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा, तंबाखू हा माल तुमकुर (कर्नाटक) येथील व्हीएसपीएम प्रॉडक्टस व व्ही.एस प्रॉडक्टस या उत्पादन कंपन्या अरूण तोलानी याला महाराष्ट्रात विक्री करण्यासाठी अवैध मार्गाने पुरवतात. एकणू १८ आरोपी गुटखा व सुगंधित तंबाखू स्थानिक वितरकांना पुरवतात हे समोर आले. त्यानुसार पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार एक टीम कर्नाटकला गेली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांनी छापा कारवाईसाठी पथके तयार केली. स्थानिक पोलीसांच्या मदतीने तुमकुर येथील अंतरसनाहल्ली इंडस्ट्रीयल परिसरात छापा टाकून १२० कोटी रूपयांचा गुटखा व अन्य साहित्य जप्त करण्यात आले. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अँथॉरिटी ऑफ इंडियाकडून पुढील कारवाई सुरू आहे.