पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार आंबेठाण ते वासुली फाटा रोडवर महिंद्रा सीआयई कंपनीच्या पार्किंगमध्ये करण्यात आलेल्या एका कारवाईमध्ये चारचाकी वाहनांमध्ये तंबाखूजन्य गुटख्याची आजूबाजूच्या परिसरात विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणूक करण्यात आली होती. या बाबतची माहिती पोलिसांना मिळाली होती. या कारवाईमध्ये १० लाख ११ हजार ६०० रुपये किमतीचा गुटखा व दोन लाख ९० हजार रुपये किमतीची मोटार, असा एकूण १३ लाख १ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी वाहनचालक अभिषेक विलास सोनवणे (वय २१ वर्षे, रा. मेदनकरवाडी) व अनुराग पंडित (वय २६ वर्षे) या दोघांना अटक करण्यात आली असून, गुटखा मालक कल्लू गुप्ता (रा. चाकण) याच्याविरोधात महाळुंगे पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी कारवाई हनुमंत भिकाजी मेदनकर यांच्या राहत्या घराच्या बिल्डिंगमध्ये करण्यात आली. याठिकाणी गुटखा साठवून ठेवण्यात आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सदरची कारवाई करण्यात आली. यामध्ये ४ लाख ८७ हजार ९२ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. याप्रकरणी सौरभ तिवारी व पवनसिंग रघुवीर सिंग या दोघांना अटक करण्यात आहे. तर कृष्ण मुरारी ऊर्फ कल्लू गुप्ता, अंकुर गुप्ता व हनुमंत भिकाजी मेदनकर यांच्याविरोधात चाकण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही कारवायांमध्ये १७ लाख ८९ हजार ५५२ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.