बारामती : तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने रविवारी (दि ७) केलेल्या कारवाईत येथील एमआयडीसीत गुटखा विक्री उघड केली आहे. या कारवाईत पोलीसांनी १ लाख ९८ हजार रुपयांचा विमल गुटख्यासह एक चारचाकी पीकअप गाडी या वाहनासह एकूण ८ लाख ९८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ज्ञानदेव ग्यानप्पा बंडगर (रा. मशिन घरकुल एमआयडीसी, सोलापूर) यास अटक करण्यात आली आहे. बेकायदा बिगर परवाना गुटखा विक्रीसाठी आणला जात असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी सापळा रचला. बारामती औद्योगिक वसाहतीत छापा टाकून एकास ताब्यात घेतले. तसेच १ लाख ९८ हजार रुपयांचा विमल गुटख्याची पाच पोती आणि एक चारचाकी पीकअप गाडी सह एकूण ८ लाख ९८ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते, सोउपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश ढवाण, गुन्हेशोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, पोलीस हवालदार दादासाहेब ठोंबरे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल पांढरे, नंदू जाधव, विजय वाघमोडे, विनोद लोखंडे आदींनी कारवाईत सहभाग घेतला.