पुणे : लॉकडाऊनच्या काळातही गुटखा बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या वितरकाला देण्यासाठी २ टेम्पोमधून घेऊन येत असलेला ५५ लाख रुपयांचा गुटखा गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाने जप्त केला.
याप्रकरणी नरेश देवाजी (रा. चिखली), सुरेश भाटी (रा. कोंढवा खुर्द) तसेच दोन्ही वाहनांचे चालक लखन लोंढे (रा.मोशी) आणि सुरेश कसाब (रा. चिंबळी फाटा, चाकण) अशा चौघांविरुद्ध लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी जप्त केलेला गुटखा हा चिखली येथील नरेश देवाशी याने कोंढव्यातील सुरेश भाटी याला पुरविण्यासाठी आणला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
नगर महामार्गावरुन गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल, उपनिरीक्षक जयदीप पाटील, तसेच अंमलदार महेंद्र पवार, सचिन ढवळे, प्रविण भालचिम, दत्ता फुलसुंदर यांनी सकाळपासून नगर रोडवर सापळा लावला होता. सकाळी साडेदहा वाजता वाघोलीहून पुण्याच्या दिशेने दोन पिकअप व्हॅन वेगाने पुण्याकडे येत होत्या. संशयावरुन दोन्ही व्हॅन थांबवून तपासणी केली. त्यात दोन्ही व्हॅनमध्ये मिळून तब्बल ५५ लाख रुपयांचा गुटखा आढळून आला. सुरेश भाटी याच्याविरुद्ध गुटखा बाळगल्याप्रकरणी यापूर्वीही कारवाई करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांच्या मार्गदर्शनानुसार याच पथकाने दमण आणि कर्नाटकात छापे घालून गुटखा फॅक्टरीवर कारवाई केली होती.सुरेश भाटी याच्याविरुद्ध गुटखा बाळगल्याप्रकरणी यापूर्वीही कारवाई करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.