शिक्रापूर: शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे अवैधरीत्या गुटखा वाहतूक करणाऱ्या तीन गाड्या सह सुमारे ७८ लाख रुपये किंमतीचा गुटखा ताब्यात घेत शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी गोपनीय खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे शिक्रापूर पोलिसांनी ही कारवाई केली.
याबाबत पोलीस हवालदार सचिन मोरे यांनी फिर्याद दिली असून लखन अश्रुबा लोंढे, (वय २७ रा ता.हवेली), सुरेश रामभाऊ कसाब( वय २१ रा. ता.खेड), कृष्णा बालाजी बिंडे (वय २१वर्ष, रा. परभणी), अंकीत शिवमोहन सिंग (रा.चाकण ता.खेड ) ,बापु गवते पुर्ण नाव व पत्ता माहीत नाही, अंकुर सुनिल गुप्ता (रा.मेदनकरवाडी ता.खेड ), विरेंद्र बुध्दसेन गुप्ता (रा.करंजाडे रायगड), महेश जसराज भाटी (रा. कोथरूड पुणे) नरेश देवासी,( रा.आळंदी,चऱ्होली रोड, ता.खेड जि.पुणे) तिन्ही वाहनाचे मालक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे - नगर रस्त्यावरून विमल, गुटखा, तंबाखू यांची बेकायदा बिगर परवानावर वाहतूक केली जात होती. पोलिसांनी सापळा रचून वाहनावर कारवाई केली. त्यावेळी एका कंटेनरमधून २० लाख रूपये किंमतीच्या तंबाखू आणि विमल पानमसाल्याच्या पुड्या असा साठा जप्त करण्यात आला. तर दुसऱ्या गाडीतून सुमारे १९ लाख २३ हजार रुपयांचा गुटखा आणि विमल, तंबाखूच्या पुड्या मिळाल्या आहेत. तिसऱ्या गाडीमध्ये सुमारे चार लाख ७० हजार रुपये किंमतीचा गुटखा व तंबाखू साठा आढळून आला आहे. अशा एकूण ७८ लाख ३ हजार २०० रूपये किंमतीचा माल हस्तगत करण्यात आला असून गुन्हे दाखल करण्यात आले आहे .