कोरेगाव भीमा : पुणे-नगर महामार्गावरून एका लक्झरी बसमधून अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गुटखा जप्त केला. मुद्देमालासह ही बस जप्त करीत तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली.
पुणे-नगर रस्त्यावरून एका लक्झरी बसमधून गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलीस नाईक योगेश पाटील यांना मिळाली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलीस नाईक योगेश पाटील, निखिल रावडे, होमगार्ड सतीश गव्हाणे यांनी कल्याणी फाटा येथे सापळा लावला. या ठिकाणी लक्झरी बस (एमपी ०९ एफए ८३५१) आल्याचे त्यांना दिसले. त्यांनी या बसला थांबवत बसची पाहणी केली असताना त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा गुटखा आढळला. पोलिसांनी बसचालकासह त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेतले. त्यांनतर शिक्रापूर पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. त्यांनतर अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्नसुरक्षा अधिकारी महेंद्र पाटील शिक्रापूर पोलीस ठाण्यात आले. त्यांनी पाहणी करीत गुटख्याची वाहतूक करणाºया लक्झरी बससह त्यातील गुटखा असा सुमारे ७ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.