राज्यामध्ये गुटखाबंदीचे आदेश शासनाने लागू केलेले असताना देखील सगळीकडेच गुटखा विक्री जोरदार सुरु असल्याचे गुटख्याच्या ठिकठिकाणी पडलेल्या रिकाम्या पुड्यावरून दिसते. मात्र या रिकाम्या पुड्या सर्वसामान्य नागिरकांना दिसत असल्या तरी पोलिसांना त्या दिसत नाही आणि दिसल्याच तर त्या कोठून आल्या याचा तपास करण्यात ‘अर्थ’ नाही असा त्यांचा समज असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये रंगते आहे.
कुरुळी परिसरासोबत मोई, निघोजे, चिंबळी, म्हाळुंगे, खालूब्रे, एमआयडीसी परिसरात गुटखा व गांजा विक्री जोरदार होत आहे. अनेक ठिकाणी शाळा, महाविद्यालय, मंदिर, हॉस्पिटल परिसरात खुलेआम गुटखा विक्री होत असून युवक गुटख्याच्या आहारी गेलेले आहेत. राज्य सरकारने २०१२ मध्ये गुटख्यावर बंदी घातली होती. त्यानंतरही युवापिढी तंबाखूजन्य गुटख्याचा वापर करीत आहेत. मात्र बंदी येण्यापूर्वीच गुटखा निर्मात्यांनी पान मसाला बनवणे सुरु केले. शिवाय गुटखा बंदी झाल्यापासून ती मिळणे बंद झाले नसले तरी दुकानदारांकडून ती चढ्या दिराने विकली जात असल्याचे सांगितले जाते. मात्र त्यांची तक्रार करण्यासाठी कोणीच पुढे येत नाही व तक्रार झालीच तर किरकोळ कारवाई करून त्यांना सोडून दिले जात असल्याचे चित्र दिसते.--
गुटख्या विक्रेत्यासह पोचविणाऱ्यांवरही कारवाई करा
गुटखा विक्री बंद असतानाही कर्नाटक, आंध्र आदी ठिकाणाहून सोलापूर- कोल्हापूर मार्गे हा गुटखा पुण्यात पोचतो आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे गुटखा सापडला त्यांच्यावर गंभीर स्वरुपाच गुन्हा दाखल झाला पाहिजे व त्यांनी गुटखा कुणाकडून घेतला याचा शोध घेऊन त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे तरच गुटखा गावागावात पोचणार नाही अशी मागणी महिला ग्रामस्थांकडून होता आहे.