पिंपरी : दोन विविध कारवायांमध्ये पोलिसांनी विदेशी सिगारेटसह तंबाखूजन्य पदार्थ व गुटखा, असा एकूण ३६ लाख ७९ हजार ९१६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने चाकण व वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी ही कारवाई केली.
दलपत पत्ताराम भाटी (रा. थेरगाव), असे आरोपीचे नाव आहे. आरोपी याने ताथवडे येथे भाड्याच्या खोलीत गुटखा साठवून ठेवत असून त्याच्या चारचाकी वाहनातून त्याची वाहतूक करून विक्री करतो, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी आठ हजार ४५० रुपयांची रोकड, सात लाख ५२ हजार २४२ रुपयांचा गुटख्याचा माल, सात लाख २० हजार रुपये किमतीचे चारचाकी वाहन, तसेच ३५ हजार रुपये किमतीचा मोबाईल, असा एकूण १५ लाख १५ हजार ६९२ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या कारवाईत रामाराम करनाराम जाट (वय २४), ओमप्रकाश विरमाराम विष्णोई (दोघे रा. खालुंब्रे), दिनेश भवरलाल भाटी (वय २४), मांगिलाल लख्खाराम चाैधरी (वय २२, दोघे रा. चिंचवड), यांच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खालुंब्रे (ता. खेड) येथे बालाजी ट्रेडिंग कंपनी नावाचे किराणा दुकान आहे. आरोपी हे या दुकानात आरोग्यविषयक सूचना देणारे वैज्ञानिक इशारा असलेले चित्र नसलेले विदेशी सिगारेट विक्री करीत आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी पाच लाख ७७ हजार नऊ रुपये किमतीचा गुटखा, तंबाखू तसेच विदेशी सिगारेट, ७२ हजार २१५ रुपयांची रोकड १६ लाख ५० हजार रुपये किमतीची तीन चारचाकी वाहने, तसेच ६५ हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल फोन, असा एकूण २१ लाख ६४ हजार २२४ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. दोन्ही कारवायांमध्ये पोलिसांनी ३६ लाख ७९ हजार ९१६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.