धायरी (पुणे): कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थ विरोधी पथक १ ने एकाला ताब्यात घेऊन तब्बल पाच लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी नेमाराम लच्छाराम प्रजापती (वय :३८ वर्षे, रा, दत्तविहार सोसायटी, जिल्हा परिषद शाळेजवळ, येवलेवाडी पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथक १ पथकातील अधिकारी व कर्मचारी कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार पांडुरंग पवार यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, येवलेवाडी या ठिकाणी एका बंदिस्त जागेत शासनाने प्रतिबंधीत केलेला सुगंधीत तंबाखुजन्य पदार्थ पान मसाला गुटखा हा विक्रीसाठी साठवून ठेवला असून तो सर्व माल आज तेथून विक्रीकरिता हलविणार आहेत.” अशी माहिती मिळाल्याने या ठिकाणी छापा टाकून नेमाराम प्रजापती याच्या ताब्यातून ५ लाख २९ हजार रुपयांचा गुटखा हा तंबाखुजन्य पदार्थ असा माल विक्रीसाठी ठेवलेला असताना मिळून आल्याने त्याच्याविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह आयुक्त, संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त, रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त( गुन्हे) श्रीनिवास घाडगे, सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे १ गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक शैलजा जानकर, लक्ष्मण ढेंगळे, पोलीस अंमलदार सुजित वाडेकर, पांडुरंग पवार, संदिप शिर्के, सचिन माळवे, प्रविण उत्तेकर, राहुल जोशी, मनोजकुमार साळुंके, मारुती पारधी, विशाल दळवी, संदेश काकडे, रेहना शेख, नितेश जाधव, योगेश मोहिते यांनी केली आहे.