अन्न व औषध प्रशासन पुणेचे अन्नसुरक्षा अधिकारी गणपत पांडुरंग कोकणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वैभव सतीश खंडेलवाल (वय ३५, रा. पाषाणकर बाग, रामदरा रोड, लोणी काळभोर) याला अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोकणे यांना शुक्रवारी (दि.५) खबऱ्यामार्फत लोणी काळभोर गावामध्ये पाषाणकर बाग, रामदरा रस्ता या ठिकाणी एकजण प्रतिबंधीत अन्नपदार्थ विक्रीसाठी एक व्यक्ती येणार असल्याचे समजले.
त्यावरुन दुपारी दोनच्या सुमारास कोकणे हे लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजू वसंत महानोर व पोलीस हवालदार रोहीदास दौलत पारखे यांच्यासह सदर ठिकाणी गेले. त्यावेळी खंडेलवाल हा एका पोत्यामध्ये संशयास्पद काहीतरी घेऊन घराचे आवारामध्ये जात असताना दिसला. पथकाने त्यास ताब्यात घेऊन तपासणी केली असता पोत्यामध्ये ३१ हजार २५२ रुपये किमतीचा विमल पान मसाला व तंबाखू हा महाराष्ट्र राज्यात उत्पादन, साठा, वाहतूक व वितरण विक्रीस प्रतिबंध केलेला साठा मिळून आला. अधिक चौकशीत त्यांने हा गुटका विक्रीसाठी आणला असल्याचे सांगितले. परंतु त्याने खरेदी विक्रीबाबत वारंवार विचारणा करूनही तपशील दाखविला नाही अथवा त्याबाबत माहिती दिली नाही. जप्त मुद्देमाल अन्न व औषध प्रशासन औंध पुणे कार्यालयाचे गोदामात ठेवण्यात आला आहे.