लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : रुपीनगर येथील १२ वीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थिनीने घरची परिस्थिती आणि अभ्यासाचा ताण यातून आलेल्या नैराश्येपोटी राहत्या घरी पंख्याच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारी साडेबाराला घडली. स्वाती सुभाष चितवे (वय १८, रा. स्वामी समर्थ हौसिंग सोसायटी, रुपीनगर, तळवडे) असे मृत मुलीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आई भाजी आणण्यासाठी बाहेर गेली होती, तर दोन लहान भावंडे शाळेत व वडील कामावर गेले होते. आई भाजी घेऊन परतली असता घराचा दरवाजा आतून बंद होता. बराच वेळ आवाज देऊनही दरवाजा न उघडल्याने आई घाबरली व शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडला असता हा प्रकार उघडकीस आला.स्वाती रुपीनगरमधील ज्ञानदीप विद्यालयामध्ये १२वीच्या विज्ञान शाखेत शिकत होती. घरात वडील एकटेच कमावते होते. ते सहा हजार रुपये पगारावर काम करीत होते. त्यामुळे घरची परिस्थिती बेताचीच होती. तरीही वडिलांचा तिला शिक्षणाचा आग्रह होता. त्यामुळेच तिने विज्ञान शाखेत प्रवेशही घेतला होता. मात्र, आर्थिक ओढाताण असह्य झाल्यामुळे तिने आत्महत्या केल्याचे समजते आहे. चितवे कुटुंब मूळचे चाकुर (लातूर) येथील असून, स्वातीचा मृतदेह अंतिम संस्कारासाठी गावी नेण्यात आला आहे.
बारावीच्या विद्यार्थिनीची नैराश्यातून आत्महत्या
By admin | Published: July 12, 2017 1:38 AM