- ज्ञानेश्वर भाेंडे
पुणे : पुण्यासह देशभरात ताप, खाेकला, थकवा आदी लक्षणांचे रुग्ण वाढले आहेत. ‘आयसीएमआर’ने ही साथ ‘एच ३ एन २’मुळे आली असल्याचे आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे हा व्हायरस चर्चेत आला आहे. पण ताे कधी आढळला, त्याचे स्वरूप, लक्षणे काय आहेत, ताे किती घातक आहे आणि त्याचा प्रसार पुण्यात किती झाला आहे, याबाबत पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या (एनआयव्ही) च्या प्रभारी संचालक डाॅ. शीला गाेडबाेले यांना ‘लाेकमत’ने ई-मेलवरून संवाद साधला. त्याला प्रतिसाद देत डाॅ. गाेडबाेले यांच्या वतीने ‘एनआयव्हीच्या ह्यूमन इन्फलूएंझा ग्रुप’च्या विभागप्रमुख व शास्त्रज्ञ डाॅ. वर्षा पाेतदार यांनी ‘लाेकमत’ने उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. त्यामध्ये त्यांनी ‘एच ३ एन २’ चा प्रसार पुण्यात १६ टक्के झाल्याचे स्पष्ट केले आहे.
प्रश्न १. काय आहे ‘एच ३ एन २’ विषाणू? कधी आढळला?
उत्तर - ‘एच ३ एन २’ हा इन्फलूएंझा विषाणू ‘ए’ याचा उपप्रकार असून ताे मनुष्याला बाधित करत आहे. ताे प्रथम १९६८ मध्ये माणसांमध्ये आढळला असून तेव्हापासून त्याचा प्रसार जगभरात हाेत आहे.
प्रश्न २. यावर्षी या विषाणूचा प्रसार इतक्या माेठ्या प्रमाणात का हाेत आहे?
उत्तर - हे हंगामी (सिझनल) इन्फलूएंझा विषाणू असून प्रत्येक सिझनमध्ये एक किंवा दाेन विषाणू हे आधीच वातावरणात प्रबळ असलेल्या विषाणूंसाेबत त्याचा प्रसार हाेताे. ही नेहमीची बाब आहे. उदा. ऑगस्ट ते ऑक्टाेबर २०२२ दरम्यान एच १ एन १ (स्वाइन फलू) हा विषाणू अधिक प्रमाणात आढळत हाेता. मात्र, नाेव्हेंबर २०२२ पासून ‘एच ३ एन २’ हा व्हायरस प्रबळ झाला आहे. त्याच्यासाेबतच आता इन्फलूएन्झा बी व्हायरसचादेखील प्रसार हाेत आहे.
प्रश्न ३. काेराेनानंतर याचा प्रसार हाेत असून, काेराेना व या विषाणूंमध्ये काही परस्पर संबंध आहे का?
उत्तर - काेविडचा विषाणू आणि ‘एच ३ एन २’ यांचा थेट संबंध नाही. परंतु, दाेन्ही विषाणू श्वसन विकाराला कारणीभूत ठरतात. त्यांचा संसर्ग झाल्यानंतर ताप, खाेकला व थकवा अशी लक्षणेही मात्र सारखीच दिसतात.
प्रश्न ४. एनआयव्ही या विषाणूवर काही संशाेधन करत आहे का?
उत्तर - एनआयव्ही ही ‘एच ३ एन २’ तसेच इतर विषाणूंवर नेहमीच संशाेधन व देखरेख करत असते. साेबत महामारीविषयक सर्वेक्षण, जिनाेमिक सर्वेक्षण करते. या इन्फ्लूएन्झा विषाणूंची टॅमिफ्लू या औषधाबाबत विषाणूविराेधी संवेदनशीलता (ॲन्टीव्हायरल सस्केप्टिबिलीटी) किती व कशी याबाबत संशाेधन सुरू असते.
प्रश्न ५. ‘एच ३ एन २’मध्ये काही बदल (म्युटेशन) हाेण्याची शक्यता आहे का?
उत्तर - इन्फलूएन्झा विषाणूंच्या जिनाेममध्ये नेहमीच किंचितसा बदल हाेत असताे, त्यालाच ‘म्युटेशन’ असे म्हणतात. त्यामुळेच प्रत्येक वर्षी इन्फलूएन्झा विषाणूवरील लस ही म्युटेशन झालेल्या व त्या वर्षी प्रसार हाेत असलेल्या स्ट्रेननुसार बदलली जाते. सध्याचे या विषाणूचे स्ट्रेन हे उत्तर ‘गाेलार्ध व्हॅक्सिन कंपाेनंट’ चे आहेत.
प्रश्न ६. ‘एनआयव्ही’ला आतापर्यंत या विषाणूचे किती नमुने प्राप्त झाले?
उत्तर - पुण्यातून विविध ठिकाणांवरून एनआयव्हीला नमुने प्राप्त हाेतात. जानेवारी ते मार्चदरम्यान २,५२९ नमुने प्राप्त झाले असून, त्यापैकी ४२८ नमुने (१६ टक्के) ‘एच ३ एन २’ साठी पाॅझिटिव्ह आले आहेत. परंतु, ही टक्केवारी पुण्याच्या एकुण लाेकसंख्येच्या तुलनेत याेग्य प्रतिनिधित्व करेल, असे नाही.
प्रश्न ७. तुमच्या मते पुण्यासह देशभरात या विषाणूचा किती प्रसार झाला आहे?
उत्तर - इन्फलूएंझा विषाणु हे श्वसनविषयक (रेस्पिरेटरी व्हायरस) असून त्यांचा प्रसार हवेद्वारे हाेताे. आयसीएमआर ने याबाबत एक अभ्यास प्रसिध्द केला असून त्यामध्ये त्यांनी भारताच्या विविध ठिकाणी याचा प्रसार झाल्याचे सांगितले आहे. पुण्यात याचे प्रमाण १६ टक्के असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे.
प्रश्न ८. ‘एच ३ एन २’ याच्या संसर्ग हाेण्यापासून बचाव कसा करायचा?
उत्तर - हे रेस्पिरेटरी व्हायरस आहेत. हातांची स्वच्छता, काेराेना सुसंगत वर्तणूक, मास्कचा वापर, सामाजिक अंतर या उपाययाेजना संसर्गापासून बचाव करण्यासाठी आहेत.