नम्रता फडणीसपुणे : सध्या ‘द काश्मीर फाइल्स’ (the kashmir files) चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. ओटीटीवर हा चित्रपट उपलब्ध असला तरी व्हॉट्सॲपवर एक लिंक पाठवून चित्रपट मोफत डाऊनलोड करण्याचे आमिष दाखविले जात असून, ती लिंक ओपन केल्यानंतर तुमच्या स्मार्ट फोनमधील डेटा हॅक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सायबर चोरांनी चित्रपटाची लोकप्रियता लक्षात घेऊन हॅकिंगचा हा नवा फंडा शोधला आहे. त्यामुळे मोबाइलधारकांनो सावधान! असा इशारा सायबरतज्ज्ञांनी दिला आहे.एकविसाव्या शतकात इंटरनेटच्या महाजालाने संवादाची विविध दालने खुली करीत माहितीचा स्रोतही उपलब्ध करून दिला आहे. परंतु इंटरनेटचे काही फायदे असण्याबरोबरच तोटेही अधिक आहेत, याची अनेकांना जाणीव नाही. कोरोनाकाळापासून ऑनलाइन व्यवहार अधिक वाढल्याने हॅकर्सने आपला मोर्चा डिजिटल माध्यमाकडे वळविला आहे.
व्हॉट्सॲपवर फॉरवर्ड केलेल्या लिंक लगेचच ओपन करणे किंवा डाऊनलोड करण्याचे प्रकार घडत असल्याने सायबर चोरांच्या हातात जणू आयतेच कोलीत मिळाले आहे. आता ‘द काश्मीर फाइल्स’ची लोकप्रियता कॅश करून मोबाइलमधील डेटा हॅक करण्याचा फंडा सायबर चोरांकडून वापरला जात आहे. राजस्थानमध्ये एका व्यक्तीला व्हॉट्सॲपवर ‘द काश्मीर फाइल्स’ची लिंक पाठविण्यात आली आणि ती लिंक ओपन केल्यावर चित्रपट मोफत डाऊनलोड करण्याचे सूचित करण्यात आले. त्यांनी ती लिंक ओपन केल्यानंतर त्या व्यक्तीला ७१ लाख रुपयांचा गंडा बसल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे या चित्रपटाची लिंक पाठवून मोफत डाऊनलोड करण्यास सांगितल्यास ती करू नये असे सायबर तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे.
’द काश्मीर फाइल्स’द्वारे होतंय हॅकिंग; सायबरचोरांचा नवा फंडा-मोबाईलधारकाला व्हॉट्सअॅपवर एक लिंक पाठविली जाते. ती लिंक ओपन केल्यावर ‘द काश्मीर फाइल्स’ मोफत डाऊनलोड करता येईल असे सांगितले जाते. जेव्हा त्या लिंकवर क्लिक केले जाते तेव्हा डाऊनलोड यंत्रणेद्वारे एकाड्राइव्हच्या माध्यमातून एक मेलवेअर मोबाईलमध्ये सोडला जातो. तो मेलवेअर स्मार्ट फोनला हॅक करतो. मोबाईलमध्ये सेव्ह करण्यात आलेली बँकेशी निगडित सर्व गोपनीय माहिती हॅक केली जाते अथवा तुमच्या मोबाईलमध्ये ज्या अॅप्सना परवानगी दिली आहे. त्यातील सर्व माहिती, फोटो हॅक केले जाऊ शकतात आणिनंतर त्याचा गैरवापर केला जाऊ शकतो. मोबाईलधारकांनी व्हॉट्सॲप आणि सोशल मीडियावर प्रसारित केलेल्या लिंक ओपन करू नयेत. आपल्या डिव्हाईसवर अँटीव्हायरस टाकून घ्यावा आणि तो वेळोवेळी अद्ययावत करावा.- रोहन न्यायाधीश, सायबरतज्ज्ञ’द काश्मीर फाल्स’सारख्या चित्रपटासंबंधी लिंक पाठवून त्या मोफत डाऊनलोड करण्यास सांगितले जाऊ शकते. त्याद्वारे मोबाईलमधील डेटा हॅक केला जाऊ शकतो. याकरिताच कोणतीही गोष्ट फुकट मिळण्याची मानसिकता बदलायला हवी. ओळखीच्या व्यक्तींनी जरी लिंक पाठवली तरी ती ओपन करता कामा नये.- डी. एस. हाके, पोलीस निरीक्षक सायबर सेल