अजित पवारांऐवजी संधी मिळाली असती तर तेव्हाच आजची परिस्थिती दिसली असती- राजेंद्र पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 11:13 AM2024-02-29T11:13:19+5:302024-02-29T11:13:57+5:30
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच एका पत्राद्वारे आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर ‘एक बारामतीकर’ नावाने ‘व्हायरल’ झालेले एक निनावी पत्र चर्चेत आले आहे...
बारामती :अजित पवार यांच्याऐवजी मला राजकारणात संधी दिली गेली असती तर आज जी परिस्थिती दिसते, ती तेव्हाच निर्माण झाली असती, असे मत आमदार रोहित पवार यांचे वडील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी व्यक्त केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच एका पत्राद्वारे आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर ‘एक बारामतीकर’ नावाने ‘व्हायरल’ झालेले एक निनावी पत्र चर्चेत आले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांचे वडील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी हे मत व्यक्त केले आहे. यावेळी एका वाहिनीशी बोलताना राजेंद्र पवार म्हणाले, लोकांच्या भावना दाबल्या जात असतील तर त्या निनावी पत्राच्या रूपाने बाहेर पडतात, यासंबंधी निनावी पत्राला फारसे महत्त्व नसते. परंतु, काही वेळा लोकांच्या भावना दाबल्या जात असतील तर त्या अशा पत्राद्वारे बाहेर येतात. त्याच पद्धतीने कोणा बारामतीकराच्या भावना यातून पुढे आल्या असतील.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अजित पवार यांच्याऐवजी तुम्हाला राजकारणात संधी दिली असती तर काय घडले असते, या प्रश्नावर राजेंद्र पवार म्हणाले, त्यावेळी स्व. आप्पासाहेब पवार हे छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे पॅनेलप्रमुख होते. त्यांनी अजित पवार यांना संधी दिली. मी शेती व व्यवसाय बघत होतो. पुढे शरद पवार यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात ते राजकीय क्षेत्रात आले. तद्नंतरच्या छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीत मी दोनदा रस दाखवला. परंतु, शरद पवार यांनी मला या क्षेत्रात जाऊ नये, असे सांगितले. ते प्रमुख असल्याने त्यांचा तो विचार किंवा आदेश मी मानला. तो त्यांचा राजकीय निर्णय होता. त्यांना राजकारण अधिक चांगल्या पद्धतीने समजते. त्या काळात कदाचित मी राजकारणात आलो असतो, तर आज जी परिस्थिती दिसते आहे त्याची सुरुवात तेव्हाच दिसली असती. परंतु, जे काही झाले ते चांगलेच झाले. त्यामुळे मला शेती, सामाजिक कार्यात लक्ष देता आले. व्यवसायाचे बस्तान बसवता आले. रोहित पवार यांचे महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर त्यांना त्याचा फायदा झाला.
वाद होऊ नये म्हणूनच तो निर्णय
पवार कुटुंबातील खदखद रोहित पवार यांना आमदारकीची संधी दिल्यापासून वाढली का, या प्रश्नावर ते म्हणाले, पण मला असे वाटत नाही. पवार घराण्यात काय चालते काय नाही, हे लोकांना डोकावून पाहायला आवडते. परंतु त्यांना वस्तुस्थिती माहीत नसते. पार्थ पवार हे खासदारकीसाठी मावळमधून उभे राहिले होते. पिंपरी चिंचवड भागात त्यांचा वावर असतो. त्यामुळे ते तिकडे उभे राहिले. रोहित पवार यांचा इंटरेस्ट असता तर ते बारामतीतून उभे राहिले असते. तसे न करता त्यांनी कर्जत-जामखेडला जाऊन तो मतदारसंघ तयार केला. वाद होऊ नये, त्यामागे हीच भूमिका असल्याचे राजेंद्र पवार यांनी स्पष्ट केले.
बारामतीत पवार विरुद्ध पवार असाच सामना होणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. याबाबत राजेंद्र पवार म्हणाले, ही बाब आमच्या कुटुंबासाठी फार वेदनादायी आहे. बारामतीकर गेल्या ५० वर्षांपासून पवार कुटुंबीयांच्या सोबत आहेत. आता जेव्हा मतदान करण्याची वेळ येईल त्यावेळी त्यांच्यावर एखाद्याने दबाव टाकला, तर त्याचे मानसिक दडपण बारामतीकरांना येणार असल्याचे त्यांनी सांगितले.