पुणे: सध्याचे कृषीमंत्री बांधावर दिसत नाहीत असा आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्यावरून कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. उद्धव ठाकरेंना बांध माहित असला असता तर आमदारांचा बांध फुटला नसता. ४० आमदार त्यांना सोडून गेले नसते. राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक रुपयांत पीक विमा देण्याचे ठरवले आहे. असा निर्णय राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. हे त्यांना दिसत नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. माझा इतका कोणताही कृषिमंत्री राज्यात फिरलेला नाही. त्यांचे दुखणे वेगळे असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.
“राज्यात होत असलेल्या अवकाळी पाऊस हे आस्मानी संकट आहे. विरोधी पक्षांनी याचे राजकारण करू नये. याचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे आहेत,” अशी ग्वाही सत्तार यांनी दिली. तसेच पीएम किसान व नमो शेतकरी योजनेतून चार हजार रुपयांचा हप्ता येत्या आठ दिवसांत जमा होईल असे आश्वासनही त्यांनी दिले.
ते म्हणाले,“बदलत्या हवामानामुळे काही नवीन पीक पॅटर्न आणता येईल का, याकडे आमचे लक्ष आहे. कमी कालावधीचे पीक घेता येईल का याचीही चाचपणी सुरू आहे. पाऊस कमी होणार असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यातही घट झाल्यास संकटाचा समाना करावा लागेल. मात्र, त्यात वाढही होण्याची शक्यता आहे. तरीदेखील शेतकरऱ्यांनी हवालदिल होण्याची गरज नाही. सरकार त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिल.”
शेतकऱ्याची मुले अधिकारी व्हावेतच परंतु काहीही न झाल्यास किमान चांगला शेतकरी व्हावे यासाठी शाळांमधून कृषी विषय शिकविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलेे. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेला वेगळे स्वरुप देण्यात आले आहे. यात आता थेट लाभार्थ्याच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजनेसारखीच राज्यानेही योजना राबविण्याचे ठरविले आहे. येत्या आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर चार हजार रुपये जमा केले जातील असेही त्यांनी सांगितले.