मंचर (पुणे) : मंचर येथील शिवगिरी मंगल कार्यालयात आज वळसे पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा पार पडला. मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल वळसे पाटील यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील चालू घडामोडी बाबत भाष्य केले. त्यांनी यावेळी महाविकास आघाडीवर टीका करत उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा शिवसेनेच्या आमदारांना घेऊन गेले. तेव्हा तत्कालीन गृहमंत्री वळसे पाटील यांनी मदत केल्याचा आरोप केला आहे. त्याला उत्तर देताना वळसे पाटील म्हणाले, सरकार पडल्यास माझेही मंत्रीपद जाणार होते. शिवसेनेतील नाराजीबाबत मी, उपमुख्यमंत्री अजित पवार ,राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यावेळचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानावर वेळोवेळी घातले होते. तुमच्या पक्षात काहीतरी गडबड आहे ती दुरुस्त करा असे सांगूनही काळजी करू नका मी बघतो असे उत्तर उद्धव ठाकरे देत होते. ठाकरे यांनी पक्षाची काळजी घेतली असती तर उद्धव सरकार पडले नसते असे त्यांनी स्पष्ट केले.
पवार यांची सभा असेल तर सर्वांनी जावे
मी सत्तेसाठी हापापलेलो नाही. तालुक्यातील जे प्रश्न शिल्लक राहिले आहेत ते सगळे सोडवायचे आहेत. आपली लढाई शरद पवार यांच्याबरोबर नाही. त्यांच्यावर रागही नाही. त्यांनी तालुक्याला भरभरून दिले आहे. कारखाना, बंधारे, बँका हे सर्व करताना ते पवार यांच्यामुळे झाले माझ्यामुळे नाही हे मी नेहमी सांगतो. पवार यांची सभा असेल तर सर्वांनी जावे असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.