जेजुरी/सासवड: लोकनेते शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पीएमपीएलची बससेवा हडपसर ते जेजुरी एमआयडीसी पर्यंतची सुरू झाली. पूर्व पुरंदर च्या पट्ट्यातील नोकरदार, उद्योजक, शेतकरी, विदयार्थी यांना या सेवेचा मोठा लाभ मिळणार आहे. अनेक वर्षांची ही मागणी आज पूर्ण झाल्याने सासवड ते जेजुरी पालखी महामार्गावर ठिकठिकाणी बस चे स्वागत होत होते.
पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी या बसमधून प्रवास करीत या बससेवेचा शुभारंभ केला. सोबत माजी आमदार अशोक टेकवडे, जिल्हा बँकेचे संचालक डॉ. दिगंबर दुर्गाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुदाम इंगळे, जेजुरीच्या नगराध्यक्षा विना सोनवणे, सासवड चे नगराध्यक्ष मार्तंड भोंडे आदींनी बसमधून प्रवास केला.
हडपसर ते जेजुरी एमआयडीसी असा हा या बसचा मार्ग असून या दरम्यान ३७ ठिकाणी थांबे आहेत. प्रत्येक २० मिनिटांनी ही बस या मार्गावरून प्रवास करणार असल्याने चाकरमानी, व्यावसायिक, शेतकरी, नोकरदार, तसेच जेजुरीला येणाऱ्या भाविकांची मोठी सोय होणार आहे. बसचे जेजुरीत आगमन झाल्यानंतर जेजुरीकरांनी फटाक्यांच्या अतिषबाजीत स्वागत केले. या प्रसंगी काँग्रेस चे तालुकाध्यक्ष प्रदीप पोमण, राष्ट्रवादीचे अध्यक्ष माणिक झेंडे, उपाध्यक्ष संदीप चिकणे उपस्थित होते.
आमदार संजय जगताप म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून हडपसर ते जेजुरी एमआयडीसी पर्यंत ची पी एम योई एल एम ची शटल बस सेवा सुरू करावी अशी मागणी होत होती. ती आज सुरु झाली आहे. ही सेवा सुरू झाल्याने पुरंदरची हडपसर ते निरा ही दळणवळणाची अर्थ वहिनी गतिशील होणार आहे. प्रत्येक खेड्याचा परिपूर्ण विकासाला मोठा हातभार लागणार आहे. जेजुरीच्या औद्योगिक क्षेत्रात नवीन उद्योग येण्यास ही या सेवेचा फायदा होणार आहे.
स्वागत मार्तंड देव संस्थानचे विश्वस्त संदीप जगताप यांनी केले. सूत्रसंचालन जिमाचे माजी अध्यक्ष प्रकाश खाडे यांनी केले. आभार बापू भोर यांनी मानले.
१२ जेजुरी
जेजुरी एमआयडीसी चौकात बसचे स्वागत करताना मान्यवर