पुणे : फेब्रुवारीच्या मध्यपासून ते २८ एप्रिलपर्यंत सक्रिय कोरोनाबाधितांमध्ये १५ ते २० पटीने वाढ झाली आहे. हडपसर-मुंढवा क्षेत्रिय कार्यालयांतर्गत असलेल्या भागात २० पट व औंध-बाणेर क्षेत्रिय कार्यालांतर्गत असलेल्या भागात १८ पटीने रुग्णसंख्या वाढली आहे़
शहरातील मध्यवर्ती भागात उपनगरांच्या तुलनेत कोरोनाबाधितांची वाढ कमी प्रमाणात झाली आहे.
मध्यवस्तीत झालेले रुग्णवाढ ही झोपडपट्टी अथवा दाटवस्तीच्या ठिकाणी झाली नाही.
ढोले पाटील क्षेत्रिय कार्यालयांतर्गत येणाऱ्या ताडीवाला रोड येथे फेब्रुवारीअखेर ७२ रूग्ण होते. तोच आकडा २८ एप्रिल रोजी १ हजार १३६ वर गेला आहे़ मात्र, या भागात कोरेगाव पार्क व आसपासच्या भागातील रुग्णवाढ कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रथमपासूनच अधिक राहिली आहे. येथे फेब्रुवारीअखेर २३९ रुग्ण होते. २८ एप्रिल रोजी ३ हजार ८७५ वर गेला आहे.
औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालयांगतर्ग दाट लोकवस्ती असलेल्या औंध बोपोडी भागात २२१ वरून ही रूग्णवाढ ३ हजार ८१६ वर गेली. बाणेर, बालेवाडी, पाषाण या भागात हीच वाढ ३४६ वरून थेट ६ हजार ३६६ वर गेली आहे. हीच परिस्थिती इतरत्रच्या उच्चभ्रू व सोसायटीचा भाग असलेल्या ठिकाणीही आढळून येत आहे.
---------
झोपडपट्टी भागातील वाढ कमीच
शहराच्या मध्यवर्ती भागात लोहियानगर, कासेवाडी येथे फेब्रुवारीमध्ये २७ रूग्ण होते तर २८ एप्रिल रोजी २३७ रूग्ण आहेत. शहरातील अन्य झोपडपट्टी भागातही रूग्ण वाढ कमी दिसून येत असून, एकंदरीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत झोपडपट्टी भाग कमी प्रमाणात बाधित झाला असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
--------------------------------
शहरातील सर्वच भागात रुग्ण संख्या कमी होतेय
शहरातील सर्वच भागात फेब्रुवारीच्या अखेरीस असलेला कोरोनाबाधितांचा आकडा मार्चअखेरीस वाढीस लागला. एप्रिलच्या मध्यापर्यंत ही वाढ सर्वच ठिकाणी तेथील रुग्णसंख्येच्या तुलनेत वाढत राहिली. मात्र एप्रिलच्या शेवटच्या दोन आठवड्यात काही अपवाद वगळता सर्वच ठिकाणी सातत्याने रुग्णसंख्या कमी होताना दिसून येत आहे.
---------------------------------