हडपसर : सामान्य नागरिकांना रात्री अपरात्री त्रासदायक ठरणाऱ्या भाईच्या वाढदिवसांना हडपसरपोलिस टार्गेट करणार आहेत, त्यामुळे अशा कार्यक्रमांचा नेहमीच त्रास होत असूनही शांत राहणाºया सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळणार आहे. रात्री अपरात्री होणारी फटाक्यांची आतिषबाजी, जल्लोष, तलवारीने केक कापणे यामुळे परिसरातील नागरिक हैराण झालेले आहेत.गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या वाढदिवसांचा तर ऊत आलेला आहे. सामान्य नागरिक पोलिसांना माहिती कळविण्यास घाबरत आहेत. हडपसर, कोंढवा, मुंढवा, वानवडी या उपनगरांमध्ये सध्या रात्री अपरात्री वाढदिवस साजरा करण्याचे फॅड वाढतच आहे.अशा वाढदिवसावर चाप लावण्यासाठी हडपसर पोलिसांनी पुढाकार घेतलेला आहे. हडपसर पोलिसांनी याबाबत नागरिकांमध्ये व व्यावसायिकांमध्ये प्रबोधन होण्यासाठी ठिकठिकाणी भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधला. दुकानदारांना व व्यावसायिकांना खंडणी मागणारे,रात्री बेरात्री वाढदिवस साजरे करणारे, अथवा भाईगिरी करणाऱ्या गुंडांवर चापबसविण्यासाठी त्यांची माहिती परिसरातील नागरिकांना विश्वासात घेऊन हडपसर पोलिसांनी घेतली. सामान्य नागरिक, पोलीस मित्र व तरुण कार्यकर्ते हे पोलिसांसाठी कान व डोळा म्हणून काम करीत असतात. नागरिक व पोलिसांचा असाच समन्वय राहिल्यास कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील. असा विश्वास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे यंनी व्यक्त केला. नागरिकांना विश्वासात घेतल्यामुळे त्याचा परिणाम म्हणून सध्या हडपसर पोलिस ठाण्यात सावकारी, खंडणी, वाढदिवस साजरे करणारे तथाकथित भाई यांच्यावर गुन्हे दाखल होत आहेत.
आता पोलिस टार्गेट करणार ‘भाईचा बड्डे’
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 7:31 PM