पुणे : हडपसर विधानसभा मतदारसंघात महायुतीकडुन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे चेतन तुपे विजयी झाले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात घड्याळाचा गजर झाला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रशांत जगताप यांचा पराभव झाला. तुपे यांनी सलग दुसऱ्यांदा आमदार होऊन इतिहास घडला आहे. भाजप आणि शिवसेनेच्या शिंदेगटाचा चेतन तुपे यांच्या विजयात महत्त्वाचा वाटा आहे.
हडपसर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे चेतन तुपे आणि महाविकास आघाडीचे प्रशांत जगताप, मनसेचे साईनाथ बाबर, अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांच्यात लढत झाली आहे. पुणे शहरातील आठ मतदारसंघात सर्वाधिक मतदार हडपसर मतदारसंघात आहे. महायुतीचे उमेदवार चेतन तुपे यांच्या विजयात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकर्त्यांबरोबर, शिवसेनेचा शिंदेगट आणि भाजपचा महत्त्वाचा वाटा आहे.
मतविभाजनाचा फटका
महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप यांचे काम शिवसेनेच्या ठाकरे गटाने केले नाही. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी आमदार महादेव बाबर यांनी अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांचे काम केले. त्यामुळे मत विभाजनाचा फटका प्रशांत जगताप यांना बसला. याउलट महायुतीमधील शिवसेनेचा शिंदे गट आणि भाजपने चेतन तुपे यांचा प्रामाणिकपणे काम केले. त्यांचा फायदा तुपे यांना झाला. मनसेच्या साईनाथ बाबर यांनीसुद्धा ३२ हजार ७५१ मतं मिळवली आहेत. मनसेच्या उमेदवारीने दोघांच्या मतांचं गणित बदललं आहे.
इतिहास घडला
हडपसर मतदारसंघात २००९ मध्ये शिवसेनेचे महादेव बाबर निवडून आले होते. त्यानंतर २०१४ मध्ये भाजपचे योगेश टिळेकर या मतदारसंघात आमदार झाले. २०१९ मध्ये टिळेकरांचा पराभव करीत राष्ट्रवादीचे चेतन तुपे आमदार झाले. त्यामुळे या मतदारसंघात सातत्याने बदल पाहावयास मिळाला आहे. पण, यावेळी चेतन तुपे सलग दुसऱ्यांदा विजयी झाले. त्यामुळे हडपसर मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा आमदार होण्याचा इतिहास चेतन तुपे यांनी केला आहे.
महिलांचा टक्का वाढल्याचा झाला फायदा
हडपसर मतदारसंघात मध्यमवर्गींयासह 'हाय प्रोफाइल' सोसायट्या आणि झोपडपट्टी भागाचाही समावेश आहे. मध्यमवर्गीय आणि उच्चवर्गीय मतदारांचे प्रमाण जास्त असलेल्या रामटेकडी, वैदुवाडी, साठेनगर हा झोपडपट्टी बहुल प्रभाग या मतदारसंघात येतो. या मतदारसंघात ६ लाख २५ हजार ६७५ मतदार आहेत. त्यापैकी ३ लाख १६ हजार ६७८ मतदांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे. त्यात १ लाख ४८ हजार ३१९ महिलांनी मतदान केले आहे. लोकसभा निवडणुकीपेक्षा या मतदारसंघात २५ हजार ४७१ महिलांनी अधिक मतदान केले आहे. लाडकी बहिण योजनेचा तुपे यांना फायदा झाला आहे.
मतमोजणीत चुरस
हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये सुरवातीपासून राष्ट्रवादी कॉग्रेस अजित पवार गटाचे चेतन तुपे हे ११व्या फेरीपर्यंत आघाडीवर होते. पण त्यानंतर १२व्या फेरीनंतर तुपे यांचे मताधिक्य कमी होण्यास सुरुवात झाली. चेतन तुपे यांना २५ हजाराचे मताधिक्य होते. त्यानंतर प्रशांत जगताप यांची मते वाढली. त्यामुळे तुपे यांचे मताधिक्य ७ हजार २२१ पर्यत खाली आले. त्यामुळे या निवडणुकीच्या मतमोजणीत चुरस झाली होती.