पिंपरी : पुण्याच्या ससून रुग्णालयात ड्रग्ज माफियांचा तर पिंपरी-चिंचवड शहरात गॅस माफियांचा हैदाेस आहे. गॅस सिलिंडर स्फोटाची घटना सकाळी घडली असती तर शेकडो विद्यार्थी आणि नागरिक जखमी झाले असते. या प्रकरणी तपास करून संबंधित पोलिस अधिकारी व कर्मचारी यांची २४ तासांत बदली करावी, अशा सूचना करून आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी पिंपरी-चिंचवड पोलिसांना खडसावले.
मुंबई -बेंगळुरू महामार्गालगत ताथवडे येथे रविवारी (दि. ८) रात्री पावणे अकराच्या सुमारास गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. टँकरमधून गॅस चोरी करताना गॅस गळती होऊन सिलिंडरचा स्फोट झाल्याचे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक दलाकडून सांगण्यात येत आहे. त्यावरून मंत्री सावंत यांनी पोलिसांना याबाबत तपास करण्याच्या सूचना केल्या. पिंपरी-चिंचवडचे सह पोलिस आयुक्त डाॅ. संजय शिंदे, पोलिस उपायुक्त डाॅ. काकासाहेब डोळे, वाकडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश जवादवाड आदी उपस्थित होते.
मंत्री सावंत म्हणाले, ही घटना गंभीर आहे. या परिसरात शाळा, महाविद्यालय आहेत. असे असताना या परिसरात गॅस टँकर उभे करण्यासाठी कोणी परवानगी दिली? टँकरमधून गॅस चोरी होत असल्याचा प्रकार पोलिसांना माहिती नव्हता काय? गॅस चोरीचे प्रकार यापूर्वीही उघड झाले असताना याला पाठीशी घालतोय कोण, असे अनेक प्रश्न आहेत. याप्रकरणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार आहे.
गॅस चोरीला पोलिस जबाबदार
गॅस टँकरमधून गॅस चोरी केली जाते. अनधिकृतपणे रिफिलिंग करून गॅस विकला जातो. याबाबत पोलिसांना माहिती असल्याचे मला माहिती आहे. याला पोलिसच जबाबदार आहेत. याबाबत मी माहिती घेतली आहे. याप्रकरणी त्वरित कारवाई झाली पाहिजे, अशा सूचना तानाजी सावंत यांनी पोलिसांना दिल्या.