पुणे: पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे. त्याने शेतकरयांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह पुण्यात पावसाने पुणेकरांना झोडपून काढले.
राज्यात रविवारी (दि.२६) कोकण, दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वारे, मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस होत आहे. छत्रपती संभाजीनगर, नंदूरबार, धुळे आणि नाशिक जिल्ह्यांत पावसासह गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. त्यामुळे आज अनेक ठिकाणी गारपीट झाली आहे.
हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर भारतात २६ नोव्हेंबर रोजी पश्चिमेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. परिणामी वायव्य आणि पश्चिम भारतावर त्याचा प्रभाव दिसून येणार आहे. या थंड वाऱ्याचा आणि दक्षिणेकडून वेगाने येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा उत्तर महाराष्ट्र, मध्य प्रदेशचा दक्षिण भाग, राजस्थानचा दक्षिण भाग आणि गुजरातच्या पूर्व भागात संयोग होऊन गारपीट होत आहे. आज उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिकसह छत्रपती संभाजीनगरमध्ये गारपीट होत आहे.
शिरूर तालुक्यातील बेट भागात पावसाने मोठा धुमाकूळ घातला आहे. अचानक गारपीट आली आणि शेतकऱ्याच्या शेतात पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हाताशी आलेले पिक या गारपिटीमुळे वाया गेली आहेत. पुण्यात सायंकाळी अचानक वादळी वारे आले आणि विजांच्या कडकडाटासह जोरात पाऊस सुरू झाला आहे.