पुणे : जगातील सर्वात सुंदर आणि चढाई करण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या कठीण असलेले नेपाळमधील माउंट अमा दबलम हे शिखर पुणे पोलिस दलातील हवालदार स्वप्निल गरड यांनी सर केले. त्यांच्यासोबत अभिषेक गायकवाड (वय २३), खुशी कमभोज यांनीही सहभाग घेतला. शिखर सर केल्यानंतर तिथे तिरंगा ध्वज फडकविण्याबराेबरच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तेथे नेम नमन करण्यात आले. यावेळी शिवरायांचा जयघाेषही करण्यात आला.
पिंपरी-चिंचवड माउंटेनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष व अनुभवी गिर्यारोहक सुरेंद्र शेळके, विनोद कमभोज यांचे त्यांना मार्गदर्शन मिळाले. माउंट अमा दबलम ६,८१२ मीटर हे शिखर तांत्रिकदृष्ट्या अतिशय अवघड आहे.
स्वप्निल गरुड म्हणाले, शिखर भौगोलिकरीत्या इतर शिखरांपेक्षा वेगळे आहे. तेथे प्रचंड थंडी व वेगवान वाऱ्याचा सामना करावा लागतो. त्यामुळे अतिशय कठीण शिखर समजले जाते. तेथे गेल्यानंतर टीमने बेस कॅम्पला दोन दिवस विश्रांती घेतली.
बेस कॅम्प ते कॅम्प १ हा साधारण ५ ते ६ तासांचा प्रवास आहे. बेस कॅम्प सोडल्यानंतर खडतर प्रवासाची सुरुवात होते. यात काही अंतर ट्रेक केल्यानंतर मोरेनमधून शिखराच्या दिशेने चढाई करत, कॅम्प १ पासून खाली साधारण ४५० मीटर रोपफिक्स केलेला होता. माउंट अमा दबलम हे शिखर अतिशय टेक्निकल असल्याने तेथे नैसर्गिक पाण्याचा स्रोत नाही.
दि. २९ ऑक्टोबर, २०२२ रोजी दुपारी १ वाजता कॅम्प २ ला पोचलो. तेथे आराम केल्यानंतर त्याच दिवशी रात्री ९ वाजता समीटसाठी रवाना झालो. कॅम्प २ पासून जसे पुढे जात होतो, तसतशी चढाई अवघड होत होती, कारण बर्फ व रॉक असा मिक्स क्लाइंबिंग रूट असल्याने व हातामध्ये दोन लेअर ग्लोव्ज, एका हातामध्ये झुमर, प्रचंड थंडी, सह्याद्रीमधील क्लाइंबिंगचा अनुभव तर होताच, परंतु उघड्या हाताने खडकावरील होल्ड पकडण्याची सवय असल्याने, ग्लोव्ज हातातून न काढता क्लाइंब करणे अधिक कठीण जात होते. रात्री १ च्या सुमारास कॅम्प ३ ला पोहोचल्यावर तेथे त्यांना ताशी १०० किलोमीटर प्रतितास इतक्या वेगाने आलेल्या वाऱ्याचा सामना करावा लागला. सर्व आव्हाने पार करत ३० ऑक्टोबर, २०२२ रोजी अभिषेक गायकवाड व स्वप्निल गरड यांनी शिखर सर केले.