- लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : शेतकऱ्यांना आपल्या शेतीच्या उताऱ्यासाठी आता धावपळ करण्याची व तलाठी कार्यालयात हेलपाटे मारायची गरज नाही. केवळ १५ रुपयांत तत्काळ संगणकीकृत उतारा हातात देण्याची प्रक्रिया शासनाने सुरू केली आहे.शेतकऱ्यांना सात-बारा उतारा आणि जमिनीच्या इतर कागदपत्रांसाठी मारावे लागणारे हेलपाटे कमी होऊन संगणकीकृत उतारे मिळण्यास सुरुवात झाली आहे. बारामती महसूल विभागातर्फे संगणकीकृत सात-बारा उतारा चावडी वाचनचा शुभारंभ सोनगाव (ता. बारामती) येथून बुधवारी (दि. १७) करण्यात आला. संगणकीकृत चावडी वाचन हे बारामती तालुक्यातील संगणकीकृत उताऱ्याचे काम पूर्ण झालेल्या १० गावांची निवड करून गावागावांत एकाच वेळी करण्यात आले. राज्य सरकारने ४ वर्षांपूर्वी सुरू केलेली ही योजना, त्यासाठी तयार करण्यात आलेल्या सॉफ्टवेअरमधील त्रुटीमुळे रखडल्याने शेतकऱ्यांना संगणकीकृत सात-बारा मिळण्यास विलंब होत होता. पूर्वी दप्तरातून शोधून सात-बारा उतारा मिळत होता. त्यामुळे उताऱ्यासाठी तलाठ्याकडे अनेक हेलपाटे मारावे लागत. शेतकऱ्यांचे हे हेलपाटे अता कमी होतील. राज्यातील तलाठ्यांची कार्यालये व त्यांच्या दप्तरांची स्थिती अगदीच वाईट असून, ब्रिटिश काळात कापडाच्या गाठोड्यात बांधून ठेवण्यात आलेल्या व त्यावर साचलेली धूळ साफ करीत तलाठ्यांना काम करावे लागत होते. कित्येक वर्षांच्या या गाटोड्यांना अनेक ठिकाणी वाळवी लागलेली आहे. मध्यंतरीच्या काळात नोंदीसाठी तयार करण्यात आलेल्या सॉफ्टवेअरमध्ये त्रुटी असल्याने दप्तर शोधूनच सात-बारा उतारा देण्याची वेळ तलाठ्यांवर आलेली होती. यासाठी तलाठ्यांना संगणक व प्रिंटर खरेदीचे अधिकारही देण्यात आले आहेत. ई-चावडी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना संगणकावरून दिल्या जाणाऱ्या प्रतींसाठी निश्चित दरही ठरविण्यात आला आहे. शासनाने हा निर्णय जाहीर केला असून, त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांना आॅनलाईन सात-बारा उतारा देण्यात आला. या वेळी प्रांताधिकारी हेमंत निकम उपस्थित होते. नायब तहसीलदार रमेश पाटील, मंडल अधिकारी स्वाती गायकवाड, तलाठी आय. ए. शेख, सहायक तलाठी हनुमंत थोरात उपस्थित होते.