बेल्हा / राजुरी (पुणे) :जुन्नर तालुक्यातील पूर्व भागात असणाऱ्या निमगावसावा परिसराला शनिवारी दुपारच्या सुमारास अवकाळी पावसाने झोडपले. यावेळी मोठ्या प्रमाणात गारा पडल्याने शेतकरी चिंतेत आहे. गारपिटीमुळे शेतातील उभ्या अशा गहू, हरभरा, कांदा, द्राक्षे, भाजीपाला व फुले या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जुन्नर तालुक्यात आठवड्यापूर्वीच अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. या पावसाने शेतातील नगदी तसेच रब्बी पिकांचे नुकसान झाले होते. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. गेल्या तीन दिवसांपासून पुन्हा अवकाळी पावसाने या पूर्व भागातील आळेफाटा, बेल्हा, निमगावसावा, मंगरूळ, झापवाडी, आदी परिसरात हजेरी लावली.
दरम्यान, शनिवारी मात्र अवकाळी पावसाने व गारांनी निमगावसावा परिसराला झोडपले. यावेळी मोठ्या प्रमाणावर गाराही पडल्या. अचानक झालेल्या पावसामुळे शेतकरी वर्गाची मोठी तारांबळ उडाली. थोडा वेळ पाऊस झाल्यानंतर अचानक गारांचा पाऊस पडला. या गारा वेचण्यासाठी लहान मुलांची मोठी धावपळ उडाली होती.
या गारांमुळे फुलांचे व भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. तसेच वीटभट्टीचेही नुकसान झाले. हवेत गारवा निर्माण झाला होता. हातातोंडाशी आलेली पिके गेल्याने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे. शेतातील पिकेही झोपली. शेतात सर्वत्र अक्षरश: बर्फच साचला होता. सर्वच ठिकाणी पांढरे ढग दिसत होते.