पुणे : उत्तरेकडील थंड वारे दक्षिणेकडे जोर वाढल्याने राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. राज्यातील सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे ७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.
याबाबत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले की, अरबी समुद्रावरील वारे दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहत होते. त्यामुळे आपल्याकडील तापमानात वाढ झाली होती. आता वार्यांची दिशा बदलली आहे. सध्या आकाश निरभ्र आहे. युरोपात थंडी वाढली असून काश्मीरमध्ये बर्फवृष्टी होत आहे. उत्तरेकडील थंड वारे दक्षिणेकडे येऊ लागले आहे. त्यामुळे राज्यातील तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. ही स्थिती नववर्षापर्यंत राहण्याची शक्यता आहे.
पुढील दोन दिवस विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.
राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस) पुणे ९.२, लोहगाव ११.८, कोल्हापूर १५.७, महाबळेश्वर ११.५, मालेगाव १०.८, नाशिक ९.१, सांगली १४.६, सातारा १२.१, सोलापूर १३.४, मुंबई २१.४, सांताक्रुझ १८, रत्नागिरी १९.७, पणजी १९.८, डहाणु १९.२, औरंगाबाद९.५, परभणी ७.४, अकोला ९.६, अमरावती ११.१, बुलढाणा ११.४, ब्रम्हपूरी १०.३, चंद्रपूर १०, गोंदिया ७, नागपूर ८.४, वाशिम १०, वर्धा ९.८.