रविवारी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास विजांच्या गडगडाटासह वादळी पावसाळा सुरुवात झाली. पावसाबरोबर गारांचा वर्षाव ही होऊ लागला. यामुळे शेतकरी वर्गाची मोठी धांदल उडाली. पावसाचा आणि वाऱ्याचा वेग एवढा होता की अनेक ठिकाणी झाडे जमीनदोस्त झाली. साकुर्डे, बेलसर, नाझरे कोळविहिरे खळद, शिवरी परिसरात फळबागांचे मोठे नुकसान झाले. शेतातील नगदी पिकांचीही गारांच्या वर्षावामुळे हानी झाली. सुमारे पाऊन तास पाऊस पडत होता.
पावसामुळे बेलसर खळद रस्त्यावरील एक बाभळीचे झाड रस्त्यावर पडल्याने रस्ता बंद झाला. साकुर्डे परिसरात जगताप वस्तीवर एक लिंबाचे झाडच गोठ्यावर पडले सुदैवाने मोठी हानी झाली नाही तर मोरदारा परिसरात आंब्यांच्या झाडांची फळे गळून पडली. सर्वत्र शेतातून शेततळीच निर्माण झाली होती.
फोटो : बेलसर खळद रस्त्यावर बाभळीचे झाड कोसळून बंद झालेला रस्ता.