लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : विदर्भ व लगतच्या भागावरील चक्रीय चक्रवात आता कायम असून, दक्षिण कोकण ते विदर्भ व लगतच्या भागावर असलेला चक्रीय चक्रवातापर्यंत कमी दाबाचा पट्टा आता उत्तर कर्नाटक ते विदर्भदरम्यान आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यावर पावसाचे सावट आहे. बुधवारी विदर्भातील गोंदिया, यवतमाळ, अकोला जिल्ह्यांत अनेक ठिकाणी गारपीट झाली आहे. गोंदिया येथे ७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे १४.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. १८ फेब्रुवारी रोजी कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह गारा पडण्याची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. १९ फेब्रुवारी रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.