पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा बंद ठेवल्याने विद्यार्थी व शिक्षक यांची प्रत्यक्ष भेट होत नाही. त्यामुळे राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्तीच्या परीक्षेला नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या निम्म्याने कमी झाल्याची माहिती समोर आली आहे. यंदा केवळ सहा-सात लाखांच्या आसपास विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
दरवर्षी पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी १० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी करतात. तसेच सर्व साधारणपणे शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारीत महिन्यात होते. मात्र, यंदा कोरोनामुळे ही परीक्षा येत्या २३ मे रोजी होणार आहे. शिक्षण विभागातर्फे परीक्षा पुढे ढकलली जात आहे.
राज्यातील ४७ हजार ६१२ शाळांनी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आपल्या विद्यार्थ्यांची नोंदणी केली असून त्यात इयत्ता पाचवी व आठवी या दोन्ही शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी एकूण संख्या ६ लाख २८ हजार ६३० एवढी आहे. पाचवीसाठी ३ लाख ८६ हजार ३२८ विद्यार्थ्यांची नोंदणी केली आहे. तसेच ५ हजार ८३८ विद्यार्थ्यांनी शुल्क न भरल्याने त्यांची नोंदणी प्रक्रिया अपूर्ण आहे. तसेच आठवीसाठी २ लाख ४२ हजार ३०२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ५ हजार ४ विद्यार्थ्यांनी नोंदणी शुल्क न भरलेले नाही. त्यामुळे अद्याप त्याची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.