पुणे : घरी, कार्यालयामध्ये पाहुणे, मित्र, नातेवाईक आले की पहिल्यांदा पाण्याचा ग्लास दिला जातो, मात्र अनेकदा एक-दोन घोट पाणी पिऊन उर्वरित पाणी तसेच ठेवले जाते. यातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात होणारा अपव्यय टाळण्यासाठी भेटायला येणाऱ्यांना अर्धा ग्लासच पाणी देण्याचा अभिनव पायंडा शहराचे प्रथम नागरिक असलेल्या महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी पाडला आहे. महापौर कार्यालयाने एक अभिनव पायंडा पाडला असून, कार्यालयामध्ये कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना अर्धा ग्लासच पाणी दिले जात आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये यंदा निम्माच पाणीसाठा झाल्याने ३० टक्के पाणीकपात लागू करून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्याचबरोबर बांधकामे, वॉशिंग सेंटर, जलतरण तलाव यासाठीच्या पाणी वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्याचबरोबर पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. महापौर कार्यालयामध्ये विविध कामानिमित्त, बैठकांसाठी अनेक लोकांची ये-जा सुरू असते. या वेळी नागरिकांना अर्धा ग्लास भरूनच पाणी देण्याच्या सूचना धनकवडे यांनी दिल्या आहेत. पाणी आणखी हवे असल्यास पुन्हा द्यावे पण पाण्याची नासाडी होऊ नये हा यामागचा हेतू आहे. महापौर कार्यालयामध्ये अर्धा-अर्धा ग्लासाने फारच छोटी पाणी बचत होणार असली तरी याचे अनुकरण संपूर्ण शहराने केल्यास खूपच मोठ्या प्रमाणात पाणी बचतीच्या मोहिमेला साह्य होऊ शकेल. शहराची लोकसंख्या ३५ लाखांच्या घरात जाऊन पोहोचली आहे, या प्रत्येकाने दररोज पाण्याचा अर्धा ग्लास वाचविला तर येत्या पावसाळ्यापर्यंत पाण्याची मोठी बचत होऊ शकेल.महापालिकेच्या वतीने नागरिकांना पाणी बचतीचे सातत्याने आवाहन केले जात आहे, त्याला प्रतिसाद देऊन नागरिकांनी विविध माध्यमातून पाणी वाचवावे असे दत्तात्रय धनकवडे यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)
महापौरांच्या दालनात अर्धा ग्लासच पाणी
By admin | Published: November 16, 2015 1:59 AM