चाकण : वडिलोपार्जित असलेल्या जमिनीच्या वाटपाचा राग मनात धरून अपहरण करण्यात आलेल्या चोवीस वर्षीय तरुणाला डांबून ठेवत व हातपाय दोरीने बांधून पंधरा जणांच्या टोळक्याने त्याला हात व लाथा-बुक्क्यांनी, तसेच लाकडी दांडक्याने गंभीर मारहाण केल्याचा प्रकार खेड तालुक्याच्या धामणगाव येथे घडला. याप्रकरणी पंधरा जणांच्या टोळक्याला सोमवारी (दि. १८) अटक करण्यात आली. चुलतमामानेच भाच्याचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.संदीप शांताराम शिंदे (वय २४, रा. आंबेठाण) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. शिंदे यांच्या फिर्यादीवरून नीतेश नारायण कदम (रा. बेंगनवाडी), विनोदकुमार रामगोपाल भारती (रा. बेंगनवाडी), नितीन अशोक मोरे (बेंगनवाडी), विकास हरिश्चंद्र गमरे (रा. बेंगनवाडी), यज्ञेश घनश्याम पाटील(रा. पालघर), तुषार जितेंद्र अमडसकर (रा. पालघर), अतिश सद्गुण (रा. नवी मुंबई), सुरेश दुर्गेश शेटे (रा. मुंबई), आरूप आस्टो मन्ना (रा. पालघर), गणेश पांडुरंग गागी (रा. पालघर), विकास अशोक जाधव (रा. पालघर), हरी बच्चुलाल दुबे (रा. पालघर), सुनील अनंत केदारी (रा. मुंबई), विशाल भगवान भालेराव (रा. मुंबई), जगन्नाथ धोंडिबा घोडके (रा. पालघर) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.येथील पोलिसांनी दिलेली माहिती अशी : संदीप शिंदे यांची नायफड (ता. खेड) येथे वडिलोपार्जित वीस ते बावीस एकर जमीन आहे. शिंदे यांचे मृत चुलते भागुजी शिंदे यांची पत्नी नानुबाई व माझे वडील शांताराम शिंदे यांच्यात गेल्या दोन वर्षांपासून जमीनवाटपाचा वाद सुरू आहे. याच कारणावरून सन २०१५ मध्ये धामणगाव येथे माझ्या मित्राचे लग्न असताना, मी व माझ्यासोबत असणारे दोन मित्र मिळून लग्नाला गेलो होतो. त्या वेळी लग्नात माझी चुलती नानुबाई हिचा भाऊ जगन्नाथ घोडकेदेखील (रा. मुंबई) आले होते. त्या वेळी त्यांनी मला माझ्या वडिलोपार्जित असलेल्या जमिनीच्या वाटपाचा राग मनात धरून, शिवीगाळ, दमदाटी करून थोबाडीत मारली, म्हणून मीदेखील त्यांच्या थोबाडीत मारली होती, तेव्हापासून घोडके माझ्यावर चिडून होता. सोमवारी (दि. १८) सकाळी सहा वाजण्याच्यादरम्यान मी आंबेठाण येथे असताना, वरील पंधरा जणांचे टोळके माझ्या घरी आले. त्यातील पाच-सहा जणांनी शिवीगाळ करून, माझ्या तोंडाला रूमाल बांधून घरातून बाहेर उचलून आणले, त्या वेळी घरात घाबरलेली माझी पत्नी अर्चना व वडील शांताराम यांनाही त्यांनी शिवीगाळ करून मारहाण केली. सोबत आणलेल्या तवेरा गाडीमधून त्यांनी माझे अपहरण केले. संबंधित गाडीतून त्यांनी मला चासकमान धरणावर नेऊन, गाडीतून बाहेर ओढून काढले, दहा ते बारा जणांनी जबरदस्तीने धरणाच्या भिंतीवरून खाली ढकलून देऊन जिवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र मी गयावया केली असता, त्यांनी मला परत गाडीत बसवून धामणगाव येथे आणले व जगन्नाथ घोडके व त्याच्या साथीदारांनी मला खाली पाडून हात व लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यातील काही जणांनी माझे हातपाय दोरीने बांधून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. यानंतर संबंधित टोळके वाडा येथे नाष्टा करण्यासाठी जाण्यापूर्वी आम्ही तेथून आल्यानंतर आम्ही तुझ्या तोंडावर अॅसिड टाकून तुला धरणात फेकून देणार आहोत, असे बजावून ते निघून गेले. त्यानंतर मी तेथे डांबून ठेवलेल्या एका घरातून तोंडाला व हातापायाला बांधलेली दोरी सोडून, घरातील माळ्यावरून उडी मारून रस्त्यावर आलो, त्यानंतर मला रस्त्यावर भेटलेल्या पोलिसांनी वाडा येथील एका दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले.याबाबतीची माहिती मिळताच संदीप शिंदे यांच्या नातेवाइकांनी दोन तवेरा गाड्यांचा पाठलाग करून, त्यातील पंधरा जणांना पकडून संबंधित वाहनांची तोडफोड करून, पंधरा जणांच्या टोळक्याला पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी त्या सर्वांना रात्री उशिरा अटक केली असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रदीप पवार व त्यांचे अन्य सहकारी करीत आहेत.
चुलत मामानेच केले भाच्याचे अपहरण, पंधरा जणांनी केली बेदम मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 11:45 PM