पुणे: सातारा जिल्ह्यातील खंडाळा एमआयडीसाठी केल्या जात असलेल्या भूसंपादनास स्थानिक शेतक-यांचा विरोध आहे. मात्र, गेल्या दहा वर्षांपासून विविध स्तरावर निवेदने देवून न्याय मिळत नसल्याने सुमारे ३५० प्रकल्पबाधित व खातेदार शेतक-यांनी सोमवारी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयावर अर्धनग्न मोर्चा काढला.तसेच आयुक्तांकडून ठोस आश्वासन न मिळाल्याने मंत्रालयाच्या दिशेने मोर्चा मार्गस्थ झाला. पुढील आठ दिवसात मोर्चा मुंबईत दाखल करण्याचे शेतकरी संघटना किसान मंचचे नियोजन आहे.
खंडाळा एमआयडीसीच्या टप्पा क्रमांक १ ,२,३ आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ साठी केसुर्डी,धनगरवाडी,शिवाजीनगर खंडाळा,बावडा,मावशी,मोर्वे ,भादे ,अहिरे या गावातील शेतक-यांच्या तब्बल दोन हजार हेक्टर जमिनीचे संपादन केले जात आहे. मात्र,केवळ ६० हेक्टर जमिनीचे संपादन करण्यास काही शेतक-यांनी संमती दर्शविली आहे. उर्वरित सर्व शेतक-यांचा भूसंपादनाच्या प्रक्रियेस विरोध असून त्यांनी याबाबत आक्षेप नोंदविला आहे. परंतु, गेल्या दहा वर्षांपासून त्यांच्या मागण्यांकडे दूर्लक्ष केले जात असल्याने प्रकल्पग्रस्त व खातेदारांनी १२ जानेवारी रोजी पायी अर्धनग्न मोर्चा सुरू केला. सोमवारी सकाळी कात्रज येथून विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. सुमारे तीन तास विभागीय आयुक्तांशी शेतकरी संघटनेची झालेली चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे पुण्यातून मंत्रालयावर मोर्चा काढण्यासाठी मोर्चेकरी मार्गस्थ झाले आहेत,असे शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हा अध्यक्ष प्रमोद जाधव यांनी सांगितले.
जाधव म्हणाले, शासनाने शेतक-यांच्या जमिनी कवडीमोल भावाने संपादित केल्या आहेत.तसेच ज्या प्रयोजनासाठी जमिनी स्वीकारल्या त्यासाठी वापर केला जात नाही.एमआयडीसीच्या पहिल्या टप्प्यासाठी सुमारे ८५० एकर,दुस-या टप्प्यासाठी केसुर्डी गावची ८३० एकर आणि राष्ट्रीय महामार्गासाठी सुमारे १०० एकर जमिन सपादित केली आहे. मात्र,तिस-या टप्प्यामधील संपूर्ण सात गावामधील जमिन नीरा देवधर प्रकल्पातील लाभ क्षेत्रात येत असल्याने संबंधित जमिनीवरील मारलेले शिक्के काढण्यात यावेत,असे शिफारस पत्र खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिले आहे.भूसंपादनास विरोध करण्यासाठी शेतकरी संघटना किसान मंचतर्फे खंडाळा ते मत्रालयापर्यंत मोर्चा काढला जात आहे.विभागीय आयुक्तांनी शेतक-यांच्या मागण्याची पूर्तता करण्यासाठी अवधी मागितला. तसेच कोणेतेही लेखी आश्वासन दिले नाही. त्यामुळे दररोज ३० ते ४० किलोमिटर दररोज पायी प्रवास करून पुढील आठ दिवसात मोर्चा मंत्रालयावर जावून धडकणार आहे,असेही प्रमोद जाधव यांनी स्पष्ट केले.