पुणे : ‘डीआरडीओ’चा संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर याच्या अटकेनंतर एटीएसने घेतलेल्या झाडाझडतीत बँक खात्याचे पासबुक मिळाले आहे. त्याचे सर्व व्यवहार सील केले आहेत. यात सापडलेली काही संगणकीय प्रणाली ताब्यात घेऊन ती न्यायवैद्यक प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठविली आहे.
पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून कुरुलकर याला अटक केली आहे. त्याला २९ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. एटीएसकडून या प्रकरणाची संपूर्ण पाळेमुळे शोधली जात आहेत. कुरुलकर याच्याशी पाकिस्तानी हेर झारा दासगुप्ता हिने व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्रामवरून संपर्क साधला असल्याचे निष्पन्न झाले आहे. तिने व्हॉट्सॲपद्वारेच कुरुलकरला मेल आयडी दिले. या जी-मेल आयडीबाबत जी-मेल कंपनीशी पत्रव्यवहार केला असता कंपनीकडून मिळालेल्या माहितीत कंट्री पाकिस्तान असे नमूद आहे. तसेच रिकव्हरी मोबाइल क्रमांक असा पाकिस्तान कोडचा क्रमांक आहे. कुरुलकर याच्या व्हॉट्सॲप चॅटबाबत अधिक तपास केला असता त्यामध्ये अजून दोन महिलांचे क्रमांक आढळले आहेत. या क्रमांकांचे तांत्रिक विश्लेषण करून त्या दोन्ही महिलांचे दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने सीआरपीसी १६१ नुसार जबाब नोंदविले आहेत.
कुरुलकरच्या १० टी मोबाइलमध्ये आढळले महिलांचे अर्धनग्न फोटो
एटीएस पोलिसांना कुरुलकर याच्या १० टी मोबाइलमध्ये इमेजेस, डॉक्युमेंट, व्हिडीओ, ऑडिओ, इन्स्टंट मेसेज, ॲप्स, कॉल लॉग, कॉन्टॅक्ट मिळाले आहेत. विशेष म्हणजे यात महिलांचे अर्धनग्न फोटो मिळाले असल्याचे सूत्रांनी सांगितले.