पुणे : शहरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पहिल्या पावसात सार्वजनिक सेवांची दाणादाण उडाल्याचे दिसून आले़. या पावसामुळे झाडाच्या फांद्या तारांवर पडून अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला तर दोन ठिकाणी महावितरणचा ट्रान्सफॉर्मरचा पुरवठा खंडीत झाला़. त्यामुळे जवळपास अर्ध्या शहराचा वीज पुरवठा किमान १ ते २ तास खंडित झाला होता़. या पावसामुळे शहरात २१ झाडपडीच्या घटना घडल्या़. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली़. सायंकाळी पावसाला सुरुवात होताच कोथरुड येथील महापारेषणचा १३२ केव्ही केंद्राचा वीज पुरवठा खंडित झाला़. त्यामुळे पावसाबरोबरच कोथरुड, वारजे, डेक्कन जिमखाना, फर्ग्युसन रोड परिसरातील वीज पुरवठा सुमारे ५० मिनिट खंडित झाला होता़. तसेच वडगाव धायरी, सिंहगड रोड, विठ्ठलवाडी, सहकारनगरचा काही भाग, धानोरी, लोहगाव, पिंपरी, भोसरीचा काही भाग अंधारात गेला़. रात्री ९ वाजेपर्यंत सिंहगड रोड वगळता शहरातील सर्व भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात महावितरणला यश आले होते़. वडगाव धायरी येथील ट्रॉन्सफार्मरमध्ये बिघाड झाल्याने सिंहगड रोड परिसरातील वीज पुरवठा रात्री उशिरापर्यंत सुरळीत झाला नव्हता़. या पावसामुळे शहरात २१ ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या. डेक्कन भागातील आपटे रस्ता तसेच कोथरूड भागात झाडे पडल्याच्या घटना घडल्या. आपटे रस्ता, कोथरूड, कर्वेनगर, गोखलेनगर, शिवाजीनगर बसस्थानक, मॉडेल कॉलनी, मंगळवार पेठ, रास्ता पेठ, रविवार पेठ, बाणेर-पाषाण रस्ता, ताडीवाला रस्ता भागातील पानमळा, येरवडा भागातील महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड वसाहत, कोरेगाव पार्क भागातील गल्ली क्रमांक ७, नायडू रुग्णालयाच्या परिसरातील कैलास स्मशानभूमी, लोकमान्यनगर भागात सायंकाळी झाडे पडली. एकाच वेळी शहराच्या वेगवेगळ्या भागातून तक्रारी आल्याने अग्निशमन दलाच्या जवानांची धावपळी उडाली. जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन रस्त्यात पडलेल्या फांद्याा हटवून वाहतूक सुरळीत केली. रात्री उशिरापर्यंत शहराच्या वेगवेगळ्या भागात झाडांच्या फांद्या पडल्याच्या तक्रारी नागरिकांकडून अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाकडे करण्यात आल्या. अनेक रस्त्यावर झाडांच्या फांद्या पडल्याने वाहतुक संथ गतीने सुरू होती.
पहिल्या पावसात अर्धे पुणे शहर अंधारात : झाडपडीच्या २१ घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 1:13 PM
रविवारी शहरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पहिल्या पावसात सार्वजनिक सेवांची दाणादाण उडाल्याचे दिसून आले़.
ठळक मुद्देअनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत रात्री उशिरापर्यंत शहराच्या वेगवेगळ्या भागात झाडांच्या फांद्या पडल्याच्या तक्रारी