पुणे : नीट परीक्षेवरून राज्य व केंद्र सरकार आमनेसामने आले असले तरी अनेक विद्यार्थ्यांची सद्यस्थितीत नीट परीक्षेला सामोरे जाण्याची तयारी नाही. ‘डीपर’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणामध्ये सुमारे साडे तीन हजार विद्यार्थ्यांपैकी निम्म्या विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलावी, असे मत व्यक्त केले आहे. तर केवळ ३७ टक्के विद्यार्थ्यांना १३ सप्टेंबरलाच परीक्षा घ्यावी, असे वाटते.कोरोना संकटामुळे सातत्याने पुढे ढकलण्यात आलेल्या जेईई व नीट प्रवेश परीक्षेबाबत अजूनही संभ्रमाचे वातावरण आहेत. जेईई परीक्षा दि. १ ते ६ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. तर नीट परीक्षेची तारीख १३ सप्टेंबर आहे. या परीक्षा पुढे ढकलाव्यात, अशी मागणी महाराष्ट्रासह अन्य काही राज्यांनी केली आहे. मात्र, केंद्र सरकार आपल्या भुमिकेवर ठाम आहे. हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहचला. कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याने सध्या परीक्षा घेतल्यास अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली जात आहे. यापार्श्वभुमीवर जेईई, नीट या परीक्षांसाठी सराव चाचणी घेणाऱ्या ‘डीपर’ या संस्थेने नीटच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन सर्वेक्षण केले.संस्थेचे संस्थापक सचिव हरीश बुटले यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वेक्षणामध्ये ३ हजार ५६० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यापैकी जवळपास ५० टक्के विद्यार्थ्यांना परीक्षा पुढे ढकलावी असे वाटत आहे. तर साधारणपणे ३५ टक्के विद्यार्थ्यांचा कल परीक्षा ठरलेल्या तारखेला घेण्याकडे आहे. उर्वरीत १२ टक्के विद्यार्थ्यांचे तळ्यात मळ्यात आहे. यावरून अनेक विद्यार्थी परीक्षा पुढे ढकलण्याच्या बाजूने असल्याचे स्पष्टपणे दिसते. अर्थात विद्यार्थी या परीक्षेसाठी सज्ज आहेत, मात्र कोरोनाचा संसर्ग होऊ नये यादृष्टीने विद्यार्थी सुरक्षा व परीक्षेचा योग्य पध्दतीने विचार करावा, असे बुटले यांनी सांगितले.----------------सर्वेक्षणामध्ये विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्ष हे एक जानेवारी २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ असे व्हावे का? असे विचारले होते. त्यापैकी ६० टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांनी संमती दर्शविलेली आहे. यावरून विद्यार्थ्यांना पहिले सत्र पूर्णपणे वाया गेल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे हे शैक्षणिक वर्ष डिसेंबर २०२१ मध्येच संपेल, अशी मनाची तयारीही विद्यार्थ्यांनी केल्याचे दिसत आहे, असे बुटले यांनी सांगितले.
निम्म्या विद्यार्थ्यांना आत्ता नकोय ‘नीट’परीक्षा ; डीपर संस्थेचे सर्वेक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 12:28 PM
नीट परीक्षेवरून राज्य व केंद्र सरकार आमनेसामने
ठळक मुद्देकेवळ ३७ टक्के विद्यार्थ्यांना १३ सप्टेंबरलाच परीक्षा घ्यावी असे वाटते