लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे शहराची कोरोना प्रतिबंधक लसीची दररोजची गरज २० हजार असताना दररोज १० हजारच लस उपलब्ध होत आहेत. यामुळे नागरिकांना केंद्रावरून परत जावे लागत आहे.
लसीकरणासाठी महापालिकेची यंत्रणा कार्यान्वित आहे. मात्र, लसीचा पुरवठाच अपुरा आहे. लसीकरण केंद्र सुरू असूनही नागरिकांना परत जाण्याची वेळ येत आहे. पुणे शहरात महापालिकेची १०० व खासगी ७२ अशी १७२ लसीकरण केंद्र सुरू आहेत़ या सर्व ठिकाणी दिवसाला साधारणत: अठरा ते वीस हजार जणांना लसीकरण केले जाते़
राज्य शासनाकडून महापालिकेला दोन दिवसांपूर्वी ३५ हजार डोस आले होते़ यापैकी सध्या दहा हजार डोस कोविशिल्डचे व ५ हजार डोस हे कोव्हॅक्सिनचे आहेत़ यातील दहा हजार कोविशिल्डचे डोस हे वितरित करण्यात आले आहेत़ गुरूवारी (२२ एप्रिल) महापालिकेला केवळ ‘दहा हजार डोस’ प्राप्त झाले आहेत़ त्यामुळे शुक्रवारी या डोसचे वितरण करायचे तरी कसे असा प्रश्न उभा राहिला आहे़ त्यामुळे शहरातील खासगी लसीकरण केंद्रांसह महापालिकेच्या बहुतांशी लसीकरण केंद्रांवर उद्या दुपारपासून लस नसल्याने अनेकांना परत जावे लागेल अशीच स्थिती आहे़ पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागासाठी ३५ हजार, पुणे महापालिका हद्दीकरिता १० हजार व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीकरिता ५ हजार डोस राज्य शासनाने पाठविले आहेत़
लसीअभावी अनेक केंद्र बंद
शहरात एप्रिल महिन्यात अनेक खासगी तथा सरकारी लसीकरण केंद्र लसीअभावी बंद करण्याची वेळ आली आहे़ ९ एप्रिल रोजी शहरात ६९ पैकी ३८ लसीकरण केंद्र पूर्णत: बंद होती़ आज केंद्र पूर्णत: बंद होत नसली तरी, दिवसाला केवळ ५० एक जणांना लस दिली की केंद्र लस संपली म्हणून बंद केली जात आहेत़ नगरसेवकांनी आणखी ५० ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्याबाबतचे प्रस्ताव दिले आहेत. महापालिकेच्या एका समितीने तर महापालिकेच्या सर्व शाळांमध्येच तातडीने लसीकरण केंद्र सुरू करण्याचा अट्टहास धरला आहे़
--------------
चौकट २
कमला नेहरू रुग्णालयात तोबा गर्दी
लसीकरणासाठी शहराच्या मध्यवर्ती भागातील महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात मोठ्या प्रमाणात नागरिक गर्दी करतात़ येथे दररोज दोनशेपेक्षा अधिक नागरिक येतात़ परंतु, आज महापालिकेकडे केवळ दहा हजार डोस आल्याने येथे शुक्रवारी केवळ १०० डोस दिले जातील़ अशावेळी आलेल्या नागरिकांचे लसीकरण कसे करायचे हा प्रश्न आहे़
दरम्यान लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना लस न मिळाल्याने होणारा मनस्ताप तर वेगळाच असून, वाढत्या उन्हात व कोरोना संसर्गाच्या काळात एकत्र येणे हे लसीकरण मोहिमेच्या दृष्टिने कितपत योग्य आहे याचा विचार करण्याची वेळ आता सर्वांववरच आली असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे़
---------------------------------
चौकट ३
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अनुकरण का होत नाही?
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत ८९ लसीकरण केंद्रे सध्या कार्यरत आहेत़ परंतु, येथे प्रत्येक केंद्रावर शंभर जणांना लस उपलब्ध असेल तरच सदर केंद्र सुरू करण्यात येते़ अन्यथा आदल्या दिवशीच उद्या केंद्रावर लस उपलब्ध राहणार नाही़? असे फलक लावून जाहीर केले जाते़ यामुळे नागरिकांचा हेलपाटाही वाचतो व विनाकारण गर्दी होऊन होणा-या कोरोनाच्या संसर्गापासून इतरांचाही बचाव होतो, असे असताना पुणे महापालिकेकडून याचे अनुकरण का केले जात नाही़? नागरिकांना शहरात किती लस उपलब्ध आहेत, लसीकरण केंद्रावर उद्या लस मिळणार का याची उत्तरे का दिली जात नाही़? हा प्रश्न मात्र अद्याप अनुत्तरीतच आहे़
--------------------------
कोट
लसीकरण केंद्रांवर लस उपलब्ध होत नसल्याने नागरिकांच्या रोषाला आम्हाला वारंवार सामोरे जावे लागत आहे़ अशी प्रतिक्रिया महापालिकेतील सत्ताधारी पक्षातील नगरसेवक अविनाश शिळीमकर यांनी व्यक्त केली़ दरम्यान शहरातील लसीकरण प्रक्रिया सुलभ होण्यासाठी महापालिकेने प्रयत्न करावेत व नागरिकांची गैरसोय टाळावी़
- नगरसेवक, अविनाश शिळीमकऱ