मिलिंद कांबळे , पिंपरी क्रीडा संघटनेतील वादामुळे, तसेच मुदतीमध्ये प्रस्ताव सादर न केल्याने शहरातील बारावीच्या खेळाडू विद्यार्थ्यांना २५ क्रीडागुणांचा लाभ मिळालेला नाही. यामुळे वर्ष वाया जाण्याच्या भीतीने विद्यार्थी नैराश्याच्या गर्तेत सापडले आहेत. या बेफिकिरीमुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा खेळ सुरू झाला आहे. राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणारे महाराष्ट्र राज्यात शेकडो विद्यार्थी आहेत. दहावी व बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास अशा खेळाडू विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार २५ गुण दिले जातात. अशा खेळाडूंची यादी संबंधित खेळाच्या राज्य संघटनेतर्फे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे ३१ मार्चपर्यंत सादर करावी लागते. मात्र, काही संघटनांतर्फे विद्यार्थ्यांची नावे महाराष्ट्र माध्यमिक शिक्षण मंडळाकडे मुदतीत दिली गेली नाहीत. त्यामुळे राज्यातील अनेक अनुत्तीर्ण खेळाडू विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांना क्रीडागुणांचा लाभ मिळाला नाही. ‘‘महाराष्ट्र हॉकी संघटना अधिकृत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पत्र महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचलनालय आणि पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास १८ जूनला दिले आहे. मात्र, आॅलिम्पिक समितीच्या मान्यतेच्या प्रश्नांमुळे या संदर्भात कायदेशीर सल्ला घेणार असल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे. तसेच, जिल्हा क्रीडा कार्यालयास पत्र दिले आहे. मुदतीपूर्वीच पात्र पाच विद्यार्थ्यांची यादी सादर केली आहे,’’असे या संदर्भात महाराष्ट्र हॉकी संघटनेचे सचिव इक्रम खान यांनी सांगितले. अद्याप या संदर्भात उत्तर मिळाले नाही. ‘‘सर्व खेळांच्या खेळाडूंच्या याद्या मुदतीमध्ये जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे पाठविण्यात आल्या आहेत. अनुत्तीर्ण झाल्यानंतर काही विद्यार्थी खेळाडू जागे होतात. ३१ मार्च या ठरलेल्या मुदतीमध्ये अर्जांचे प्रस्ताव विविध क्रीडा संघटनांकडून सादर केले जातात. सदर खेळाडूंना त्यांचा लाभ मिळतो,’’अशी माहिती जिल्हा क्रीडाधिकारी सुहास पाटील यांनी दिली. दोन वेगवेगळ्या हॉकी संघटनेच्या वादात खेळाडूला लाभ मिळाला नाही. महाराष्ट्र हॉकी संघटना आणि हॉकी महाराष्ट्र अशा दोन संघटना राज्यात कार्यरत आहेत. हा वाद न्यायालयात आहे. अधिकृत संघटना ठरत नसल्याने शहरातील एका कनिष्ठ महाविद्यालयाच्या बारावी अनुत्तीर्ण झालेल्या राज्य हॉकीपटूस क्रीडागुण मिळाले नाहीत. वर्षभरात खेळासाठी घाम गाळून उत्तम कामगिरी करूनही गुणांचा लाभ मिळत नसल्याने अनेक गुणवान खेळाडू नैराश्येच्या गर्तेत सापडले आहेत. यामुळे त्याचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे. या नैराश्येतून विद्यार्थ्यांनी टोकाचे पाऊल उचलल्यास त्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
बारावी अनुत्तीर्ण हॉकीपटूला क्रीडागुणाचा ‘गोल’
By admin | Published: June 27, 2015 11:57 PM