पुणे: मेट्रोच्या कृषी महाविद्यालयापासून सुरू करण्यात आलेल्या दोन्ही बोगद्यांचे सिव्हिल कोर्टपर्यंतचे निम्मे काम पूर्ण झाले आहे. अपघात किंवा अन्य काही असाधारण कारण असेल तर प्रवाशांना हे बोगदे आतून ओलांडता येणार आहेत. आता सिव्हिल कोर्ट स्थानकाचे काम सुरू असून त्यानंतर हे बोगदे सिव्हिल कोर्टपासून पुढे नदीखालून थेट स्वारगेटपर्यंत जाणार आहेत.
येणाऱ्या व जाणाऱ्या अशा दोन गाड्यांसाठी दोन बोगदे आहेत. प्रत्येक बोगद्याचा व्यास ५.८ मीटर म्हणून साधारण १५ फूटांचा आहे. उतार संपला की प्रत्यक्ष बोगदे शिवाजीनगरपासून सुरू होतात ते थेट स्वारगेटला पूर्ण होतात. आता कृषी महाविद्यालयापासून ते सिव्हिल कोर्टपर्यंतचे प्रत्येकी २.३ किलोमीटर अंतराचे बोगद्यांचे सगळे काम आता पूर्ण झाले आहे. त्याच्या आतून मेट्रो कर्मचाऱ्यांसाठी वॉक वे आहे. दुरूस्ती तसेच अन्य कामांसाठी म्हणून कर्मचारी त्यावरून चालत जाऊ शकतील. त्याशिवाय बोगद्यात वरील बाजूने वीज, सिग्नल, पाणी यांची पाईपलाईन असेल. खालील बाजूने ड्रेनेजलाईनही असणार आहे.
मेट्रोच्या एकूण ५ किलोमीटरच्या भूयारी मार्गात ५ स्थानके आहेत. तिथे हे बोगदे एकमेकांना जोडले जातील व स्थानकाची हद्द संपली की पुन्हा वेगळे होतील. स्थानक वगळता अन्य मार्गावर विशिष्ट अंतरावर एका बोगद्यातून दुसऱ्या बोगद्यात जाण्यासाठी खास मार्ग तयार करण्यात आले आहेत. मेट्रोला अपघात झाला, ती नादुरूस्त झाली तर प्रवाशांना या मार्गाने दुसऱ्या बोगद्यात नेता यावे यासाठी ही व्यवस्था असल्याचे मेट्रोकडून सांगण्यात आले.
सिव्हिल कोर्ट स्थानकाचे काम आता सुरू करण्यात आले आहे. त्याचा पाया तयार झाला की लगेचच टीबीएम (टनेल बोअरिंग मशिन) पुढे सरकवून सिव्हिल कोर्टच्या पुढील भूयारी मार्गाचे काम सुरू करण्यात येईल. दोन्ही बोगदे मुठा नदीखालून जाणार असल्याने ते काम मेट्रोसाठी आव्हानात्मक आहे.
बोगद्यांची वैशिष्ट्ये: जमिनीखाली २८ मीटरआतील बाजूस वॉक वेप्रवाशांना बोगदा ओलांडता येणार१५ फूटांचा व्यासस्थानकांमध्ये एकत्र होऊन पुन्हा वेगळे होणारट्यूब सारखा आकारसिमेंटच्या पक्क्या रिंगांचे अस्तर (२६३)